
शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामीण विकासाला नवी गती देणारा अर्थसंकल्प – प्रा. रमेशजी बारसागडे
राज्याच्या अर्थसंकल्पनामूळे गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा
महाराष्ट्र राज्याचा २०२६–२७ चा अर्थसंकल्प मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केला असून हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांनी व्यक्त केले आहे.
या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवक, महिला, उद्योग क्षेत्र तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी “महाविस्तार – एआय” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे मार्गदर्शन, रोगनियंत्रण व बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. तसेच १४–१५ प्रमुख पिकांसाठी एकात्मिक पुरवठा साखळी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अधिक बळकट करण्यात येणार असून या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ग्रामीण विकासासाठी गावागावात रस्ते विकास, पायाभूत सुविधा, सिंचन व्यवस्था आणि शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. पशूजन्य उत्पादन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसायात वाढ करून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचा सरकारचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतो.
ग्रामीण गरीब कुटुंबांना घरकुल देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाखो घरे पूर्ण करण्यात येणार असून या घरांवर रूफटॉप सोलर सुविधा उपलब्ध करून देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
याशिवाय ग्रामीण रस्ते, पायाभूत सुविधा, उद्योगवाढ, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देत राज्याच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्याचा सरकारचा निर्धार या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत असल्याचे प्रा. रमेशजी बारसागडे यांनी सांगितले.
शेतकरी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णयही स्वागतार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठीही या अर्थसंकल्पातून महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे. गडचिरोली येथे नवे स्टील हब उभारण्याची योजना असून विशाल व अतिविशाल स्टील उद्योगांच्या माध्यमातून सुमारे २.६२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पांमुळे ७०,००० हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
तसेच खाण महामार्गाचे जाळे आणि रस्ते विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असून यामुळे उद्योग, व्यापार आणि वाहतुकीला गती मिळणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ५ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याची घोषणा देखील या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
एकूणच हा अर्थसंकल्प शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि ग्रामीण भागाच्या विकासाला गती देणारा असून विकसित महाराष्ट्र २०४७ या ध्येयाच्या दिशेने राज्याला पुढे नेणारा असल्याचा विश्वास प्रा. रमेशजी बारसागडे यांनी व्यक्त केला.








