Home गडचिरोली आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याशी जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर सखोल चर्चा; माजी आमदार...

आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याशी जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर सखोल चर्चा; माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांची ठोस मागणी

0
23

आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याशी जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर सखोल चर्चा; माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांची ठोस मागणी

 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील विविध प्रलंबित प्रश्न, ग्रामीण भागातील अपुऱ्या सुविधा आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आंबिटकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आरोग्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या निवासस्थानी ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

 

या बैठकीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपकेंद्रांमधील डॉक्टरांची कमतरता, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसणे, अत्याधुनिक उपकरणांचा अभाव, औषध साठ्याची अपुरी उपलब्धता तसेच दुर्गम भागातील रुग्णवाहिका सेवांचा प्रश्न आदी मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली.

 

माजी आमदार डॉ. उसेंडी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आयसीयू सुविधा वाढविणे, मातृत्व व बालसंगोपन विभाग बळकट करणे, तसेच रक्तपेढी व आपत्कालीन सेवा सक्षम करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, “आरोग्य हा मूलभूत अधिकार असून गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे.”

 

यावर आरोग्य मंत्री श्री. आंबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येतील, असे आश्वासन दिले. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील तसेच रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीमान केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

 

या प्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, मुक्तेश्वर काटवे, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत जंबेवार, नगरसेवक शेखर आखाडे तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील आरोग्य प्रश्न सोडविण्यासाठी झालेली ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात असून, आगामी काळात ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!