
चार श्रम कायदे रद्द करण्याची मागणी; १२ फेब्रुवारीच्या देशव्यापी आम हडतालास आयटकचा पाठिंबा
सिरोंचा (रवि बारसागंडी )प्रतिनिधी :रवि बारसागंडी
सिरोंचा : आयटक तालुका सिरोंचा शाखेच्या वतीने केंद्र सरकारने लागू केलेले चार नवे श्रम कायदे तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी करत देशव्यापी आम हडतालास जाहीर समर्थन देण्यात आले आहे. याबाबत मा. तहसीलदार साहेब, सिरोंचा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हे चारही श्रम कायदे कामगारविरोधी व कॉर्पोरेटधार्जिणे असून कामगार, कंत्राटी कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील मजूर व शेतमजूर यांच्या हक्कांवर घाला घालणारे आहेत. संघटन स्वातंत्र्य, संपाचा अधिकार, वेतन सुरक्षा, कामाचे तास, सामाजिक सुरक्षा आणि नोकरीची हमी यांवर या कायद्यांचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
केंद्रीय ट्रेड युनियनच्या संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी आम हडतालास आयटक तालुका सिरोंचा शाखेने जाहीर पाठिंबा दिला असून शासनाने कामगारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी केली आहे.








