
एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना विनम्र अभिवादन; भाजपा गडचिरोली शहरच्या शक्ती केंद्रनिहाय पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात
गडचिरोली :प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक आणि ‘एकात्म मानववाद’ या तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक, संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्थान असलेल्या श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी, गडचिरोली शहराच्या वतीने शहरातील विविध शक्ती केंद्रांमध्ये अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी त्यांच्या पावन स्मृतीस पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी प्रणाम करण्यात आले तसेच त्यांच्या राष्ट्रनिष्ठ, मूल्याधिष्ठित व सर्वसमावेशक विचारांचे स्मरण करण्यात आले.
शहरातील विविध भागांत मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम पार पडले.
विवेकानंद नगर येथे नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
महिला व बालकल्याण सभापती न.प. सीमा कन्नमवार यांच्या हस्ते कार्यक्रम झाला.
चनकाई नगर येथे बांधकाम सभापती न.प. तथा भाजपा शहर अध्यक्ष अनिल कुनघाळकर व न.प. उपाध्यक्ष तथा शहर महामंत्री निखिल चरडे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी नगर येथे उपशिक्षण सभापती शिल्पा हेमके यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला.
तर लांझेडा येथे नगरसेविका कोमल नैताम यांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचे स्मरण करताना सांगितले की, त्यांचे ‘एकात्म मानववाद’ हे तत्त्वज्ञान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा मार्ग दाखवणारे आहे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय देत राष्ट्र उभारणीसाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास नगरसेवक अंकित गव्हारे, नगरसेविका साक्षी बोलूवार, नगरसेविका अर्चना निंबोड, नगरसेवक सुधाकर येनगधलवार, विनोद देवोजवार, अंकित हेमके, निखिल गुंडमवार, उराडे जी, लाटकर जी, गणेश नैताम तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजसेवा व राष्ट्रसेवेची वाटचाल अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.








