
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत मार्कंडा यात्रा नियोजन आढावा बैठक संपन्न
“भाविकांना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज”
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र मार्कंडा येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुयोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माननीय डॉ. मिलिंदजी नरोटे साहेब, आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजनात्मक आढावा बैठक उत्साहात व गांभीर्यपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ही बैठक चामोर्शी तहसील कार्यालयात पार पडली.
बैठकीत यात्रेच्या काळात भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, तात्पुरते शौचालय, स्वच्छता व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, पार्किंग सुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात व यात्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, अशा स्पष्ट सूचना आमदार डॉ. नरोटे यांनी यावेळी दिल्या.
मार्कंडा हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे केंद्र असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुखद आणि सुरक्षित अनुभव मिळावा, ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत आमदारांनी व्यक्त केले. यात्रेच्या नियोजनात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसून सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी चामोर्शी तहसीलदार माननीय प्रशांत घोरुडे साहेब, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पोळ साहेब, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री मधुकर केशव भांडेकर, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीमती रोशनी ताई वरघंटे, मार्कंडा देवस्थानाचे अध्यक्ष भांडेकर जी, चपराळा देवस्थानाचे अध्यक्ष संजय भाऊ पणंदिलवार, पोलीस निरीक्षक चामोर्शी, नायब तहसीलदार, विविध विभागांचे उपअभियंते, भाजयुमो सचिव नरेश भाऊ अलसावर, भाजयुमो उपाध्यक्ष नीरज रामानुजवार, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते माणिकजी कोहळे, सोपान नैताम, सोनटक्के तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान स्वच्छता मोहिमेचे नियोजन, आरोग्य पथकांची नियुक्ती, आपत्कालीन सेवा तत्पर ठेवणे, वाहतूक मार्गांचे नियोजन व यात्रास्थळी सुयोग्य दिशादर्शक फलक लावण्याबाबतही चर्चा करण्यात आली. भाविकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत सर्व विभागांनी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
मार्कंडा यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व देवस्थान समिती यांच्यातील समन्वयाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.








