
सिरोंचा तालुक्यात जप्राबाद (गोलकार मोला) येथे वीजप्रश्न गंभीर; नवीन डीपी बसवण्याची मागणी, AIYF चा आंदोलनाचा इशारा
07/02/2026
गडचिरोली:सिरोंचा तालुक्यातील जप्राबाद (गोलकार मोला) येथे शासनाच्या विशेष योजनेतून प्रस्तावित असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर (डीपी) मागील दोन ते तीन वर्षांपासून कार्यान्वित नसल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी तसेच ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने यापूर्वीही संबंधित महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ऑल इंडिया युथ फेडरेशनचे तालुका अध्यक्ष रवि बारसागंडी यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
ते म्हणाले, “शासनाच्या योजनेअंतर्गत जप्राबाद (गोलकार मोला) येथे तात्काळ नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा. वारंवार निवेदन देऊनही जर महावितरण प्रशासन दुर्लक्ष करत असेल, तर ८ दिवसांत डीपी न बसवल्यास ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
दरम्यान, वीजअभावी रात्रीच्या वेळी जंगली श्वापदांची भीती वाढली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करून तातडीने नवीन डीपी बसवण्याची मागणी ग्रामस्थ, नागरिक व AIYF च्या वतीने करण्यात आली आहे.
महावितरण प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.








