
हळदवाही–रेगडी जि.प. क्षेत्रातील विविध समस्या घेऊन भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांची आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याशी भेट
गडचिरोली | प्रतिनिधी :
हळदवाही–रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील मूलभूत प्रश्न आमदारांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी सुरेश शहा यांनी अनेक गावांमध्ये वाढीव विद्युत पोलांची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगितले. संबंधित ग्रामपंचायतींनी याबाबत प्रस्ताव सादर केले असतानाही अद्याप वाढीव पोल बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असून यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी आमदारांकडे केली.
तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी धान विक्री केली असली तरी अद्याप त्यांना त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून या विषयावर मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर धानाचे पैसे मिळवून द्यावेत, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
यासोबतच मौजा रेगडी येथे तलाठी कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणीही सुरेश शहा यांनी मांडली. तलाठी बसण्यासाठी आवश्यक खोली देण्यास ग्रामपंचायत रेगडी तयार असून याबाबत तात्काळ ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या सर्व मागण्यांवर माननीय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाशी समन्वय साधून योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीनंतर सुरेश शहा यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन तत्काळ सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचे आभार व्यक्त केले.








