
देवदर्शनावरून परतताना बुलेरोचा अपघात; ट्रकशी समोरासमोर धडक, 10 जण गंभीर जखमी
अहेरी : छलेवाडा येथून मेडाराम येथे देवदर्शन करून परतत असताना बुलेरो गाडी व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात बुलेरोचा चालक वसंत चव्हाण हा गंभीर जखमी होऊन कोमात गेला असून वाहनातील इतर 9 प्रवासीही गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात 29 जानेवारी रोजी घडला.
बुलेरो गाडी क्रमांक MH 33 A 3955 आणि समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक इतकी भयानक होती की बुलेरोचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सर्व जखमींना पुढील उपचारासाठी भूपणपाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेग आणि निष्काळजीपणा हे या भीषण अपघातामागील संभाव्य कारण असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना नागरिकांकडून केली जात आहे.








