
कणखर जननेते स्व. अजित पवार यांना कर्तव्य कक्ष क्र. 1 येथे भावपूर्ण श्रद्धांजली
दिं 29/01/2026
गडचिरोली : सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, कार्यक्षमता आणि जनहिताची तळमळ जपणारे कणखर जननेते राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज गडचिरोली येथील आमदार यांच्या ‘कर्तव्य कक्ष क्रमांक १’ कार्यालयात भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेस मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक,नगरसेविका, तसेच नागरिक उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संपूर्ण वातावरण शोकाकुल झाले होते.
प्रशासकीय कामकाजावर असलेली ठाम पकड, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांबाबत असलेली संवेदनशीलता यामुळे स्व. अजित पवार हे जनतेत विशेष मानाचे स्थान मिळवून होते. त्यांनी सामाजिक व सार्वजनिक जीवनात दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
ही श्रद्धांजली आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आली. आपल्या मनोगतात त्यांनी स्व. अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून देत, “समाजासाठी झटणारा एक निष्ठावान कार्यकर्ता आपण गमावला आहे,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
शोकसभेला नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.








