Home Breaking News गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

0
62

गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

दुष्काळसदृश परिस्थिती, रानटी हत्तींचा उपद्रव आणि एसटीच्या समस्यांकडे वेधले लक्ष; शेतकरी व प्रवाशांना तातडीने दिलासा देण्याची मागणी

मुंबई, दि. २४ सप्टेंबर २०२६ : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध गंभीर प्रश्नांसंदर्भात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.

गडचिरोली जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर बाधित भागांचे तातडीने सर्वेक्षण करून निकषांनुसार आवश्यक कार्यवाही करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. नरोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

जिल्ह्यात रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला. रानटी हत्तींच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक यंत्रणा अधिक सक्षम करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पुरेशी भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या एसटी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एसटी वाहतुकीशी संबंधित समस्याही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. एसटी बसेसची अपुरी संख्या तसेच चालक व वाहकांची रिक्त पदे यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आमदार डॉ. नरोटे यांनी सांगितले. रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, प्रवाशांच्या गरजेनुसार अतिरिक्त बसेस उपलब्ध करून द्याव्यात आणि प्रवासी सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली.

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या या प्रश्नांवर शासन स्तरावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करून नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!