
गडचिरोलीच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात भेट; पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांना नियमित सेवेत सामावून घेण्याची मागणी
शिक्षकांची रिक्त पदे, दुर्गम भागातील शाळांच्या अडचणी, शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधांसह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा
मुंबई, दि. २४ सप्टेंबर २०२६ : गडचिरोली जिल्ह्यातील विविध शैक्षणिक समस्या तसेच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना शासन स्तरावर मार्गी लावण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात मागील दोन ते तीन वर्षांपासून रिक्त पदांवर कंत्राटी शिक्षक सेवा देत आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि आजवरची सेवा विचारात घेऊन त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.
यासोबतच जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरणे, दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शाळांमध्ये आवश्यक भौतिक व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांकडे आमदार डॉ. नरोटे यांनी मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नुकत्याच केलेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यात विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक परिस्थिती, उपलब्ध सुविधा आणि अडचणींचा आढावा घेतला होता. या दौऱ्यादरम्यान देण्यात आलेल्या सूचना व निर्देशांची तातडीने आणि कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, जेणेकरून जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल, अशी मागणीही आमदार डॉ. नरोटे यांनी केली.
गडचिरोली हा दुर्गम, अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्हा असल्याने येथील शैक्षणिक परिस्थितीकडे विशेष बाब म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम शिक्षक आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन स्तरावर आवश्यक निर्णय तातडीने घेण्यात यावेत, अशी अपेक्षा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी व्यक्त केली.
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांच्या प्रश्नांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले.








