Home Breaking News शिवणीजवळ एसटी बस पलटी; ३१ प्रवासी जखमी; बसने प्रवास करत होते ६८...

शिवणीजवळ एसटी बस पलटी; ३१ प्रवासी जखमी; बसने प्रवास करत होते ६८ प्रवासी; स्टेअरिंग लॉक झाल्याची प्राथमिक माहिती

0
49
Oplus_131072

शिवणीजवळ एसटी बस पलटी; ३१ प्रवासी जखमी; बसने प्रवास करत होते ६८ प्रवासी; स्टेअरिंग लॉक झाल्याची प्राथमिक माहिती

जुन्या एसटी बसची सुरक्षितता अन् गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

गडचिरोली, दि. १८ सप्टेंबर २०२६ : गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणारी MH 06 8848 क्रमांकाची एसटी बस शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजता शिवणी गावाजवळ अचानक पलटी झाली. बसमध्ये तब्बल ६८ प्रवासी होते. या अपघातात सुमारे ३१ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यापैकी २९ जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याची प्रक्रिया सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवणीजवळ धावत्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर पलटी झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. जखमींपैकी काहींना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण मात्र अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यात धावणाऱ्या जुन्या एसटी बसगाड्यांची तांत्रिक स्थिती आणि नियमित देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही बसचे चाक निखळल्याने अपघाताच्या घटना घडल्याचे सांगण्यात येत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, गडचिरोली–चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सीवरील खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेचाही मुद्दा पुन्हा समोर आला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करून बसची तांत्रिक स्थिती तपासावी, अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करावे आणि दोष आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!