Home Breaking News घनकचरा शेड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; सरपंच, ग्रामसेवक व अभियंत्यावर फौजदारी गुन्हा...

घनकचरा शेड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; सरपंच, ग्रामसेवक व अभियंत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दर्शनी

0
12
Oplus_131072

घनकचरा शेड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; सरपंच, ग्रामसेवक व अभियंत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

दर्शनी मालच्या ग्रामस्थांचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन; ₹१.५२ लाखांच्या कामात अनियमिततेचा आरोप

अपूर्ण व निकृष्ट काम पूर्ण दाखवून बनावट मोजमाप नोंदी केल्याचा ग्रामस्थांचा दावा; कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

गडचिरोली : गट ग्रामपंचायत दर्शनी माल येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेल्या शेडच्या बांधकामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणातील कथित अनियमिततेची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच, ग्रामसेवक आणि मोजमाप करणाऱ्या अभियंत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, घनकचरा व्यवस्थापन शेडसाठी ₹१ लाख ५२ हजार ४२२ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात बांधकाम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असतानाही ते पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित मोजमाप अभियंता यांनी संगनमत करून कामाच्या मोजमापाबाबत चुकीच्या अथवा बनावट नोंदी करून शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शासन निर्णय दिनांक ४ जानेवारी २०१७ मधील लागू तरतुदींनुसार चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. संबंधित यंत्रणेकडून तातडीने कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.

दरम्यान, ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी प्रकरणाची दखल घेत संबंधित यंत्रणेकडून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. शासकीय निधीच्या वापरात गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

निवेदन सादर करताना लोमेश कुळमेथे (जिल्हा सोशल मीडिया सहसंयोजक, गडचिरोली), धोंडू उडान (पोलीस पाटील, दर्शनी माल), कवडू मशाखेत्री, चरणदास पिपरे (तंटामुक्त समिती अध्यक्ष), जयदेव कोठरे, किसन उडान, सुधाकर वैरागडे, नागेश्वर उडान, गजानन पुरी, उमाजी भोयर, आनंदराव पिंपरे, सदाशिव वासेकर, मिथुन उडान, राहुल भोयर, अरुण वासेकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!