Home Breaking News येवलीत निराधार लाभार्थ्यांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहीम; आकाश सातपुते यांचा पुढाकार

येवलीत निराधार लाभार्थ्यांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहीम; आकाश सातपुते यांचा पुढाकार

0
26

येवलीत निराधार लाभार्थ्यांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहीम; आकाश सातपुते यांचा पुढाकार

डीबीटीचा लाभ सुरळीत सुरू राहण्यासाठी DLC काढण्याचे प्रशासनाचे आवाहन; आठ लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह जीवन प्रमाणपत्र पूर्ण

निराधार, वृद्ध, विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांनी तातडीने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढावे – नायब तहसीलदार ज्ञानेश्वर ठाकरे

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यात शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेणाऱ्या निराधार, वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे मिळणारे अनुदान सुरळीत सुरू राहावे, यासाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (DLC) अर्थात जीवन प्रमाणपत्र काढण्याचे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य आकाश सातपुते यांनी पुढाकार घेत येवली परिसरातील लाभार्थ्यांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढण्यासाठी प्रत्यक्ष सहकार्य केले.

नायब तहसीलदार ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचे महत्त्व, त्याची प्रक्रिया तसेच डीबीटीचा लाभ नियमित मिळण्यासाठी त्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून ‘Beneficiary Satyapan Application’ प्रणालीद्वारे त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

या मोहिमेत कल्पना शिवाजी मोहुर्ले यांचे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत, बापुजी श्रावण खेवले, शकुंतला किसन कुणघाडकर, विठाबाई तुकाराम गेडाम, देवाजी दिना कांबळे आणि मानकाबाई मालुजी मेश्राम यांचे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत, तर सिंधुबाई सुधाकर गावळे आणि सारुबाई दिवाकर पिपरे यांचे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेअंतर्गत डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पूर्ण करण्यात आले.

शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळत असल्याने आवश्यक पडताळणी वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. विशेषतः वृद्ध, दिव्यांग तसेच निराधार लाभार्थ्यांना तांत्रिक प्रक्रियेमुळे अडचणी येऊ नयेत, यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचून सहकार्य करण्यावर या मोहिमेत भर देण्यात आला.

“संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसह विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या अनुदानापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये. गडचिरोली तालुक्यातील तसेच येवली परिसरातील ज्या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट अद्याप काढण्यात आलेले नाही, त्यांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करून डीबीटीचा लाभ सुरळीत ठेवावा,” असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य आकाश सातपुते आणि नायब तहसीलदार ज्ञानेश्वर ठाकरे यांनी केले आहे.

उर्वरित लाभार्थ्यांनीही DLC प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी

येवली येथे राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे आठ लाभार्थ्यांची डिजिटल पडताळणी पूर्ण झाली असून, परिसरातील उर्वरित लाभार्थ्यांनीही आपले जीवन प्रमाणपत्र वेळेत काढावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांना शासकीय अनुदान नियमित मिळावे आणि केवळ तांत्रिक अथवा पडताळणी प्रक्रियेअभावी त्यांचा लाभ खंडित होऊ नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!