Home Breaking News गडचिरोली जिल्हा रुग्णालयाला मोठा धक्का!सतत चर्चेत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक डॉ....

गडचिरोली जिल्हा रुग्णालयाला मोठा धक्का!सतत चर्चेत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित; विभागीय चौकशीचे आदेश

0
40

गडचिरोली जिल्हा रुग्णालयाला मोठा धक्का!सतत चर्चेत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित; विभागीय चौकशीचे आदेश

 

गडचिरोली : जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्यावर महाराष्ट्र शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन आदेशातून डॉ. लहाडे यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शासन आदेशातील नमूद आरोपांनुसार, पर्यवेक्षकीय जबाबदारी पार पाडताना अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका डॉ. लहाडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या आरोपांची सविस्तर चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्याच्या आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली असून, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभाराकडे आता अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. शासनाच्या या कठोर पावलामुळे प्रशासकीय जबाबदारी आणि पर्यवेक्षकीय कर्तव्यांबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शासन आदेशानुसार, निलंबन काळात डॉ. लहाडे यांचे मुख्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे राहणार आहे. सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांनुसार निलंबन कालावधीत खासगी नोकरी, व्यापार किंवा उद्योगात सहभागी होता येणार नाही. नियमानुसार त्यांना निर्वाहभत्ता व इतर अनुज्ञेय भत्ते मिळणार आहेत. ही कारवाई महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने करण्यात आली असून, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल महादेव कुमेरिये यांनी आदेशावर डिजिटल स्वाक्षरी केली आहे. मात्र, डॉ. लहाडे यांच्यावरील आरोप अद्याप विभागीय चौकशीच्या प्रक्रियेत आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आरोपांची वस्तुस्थिती आणि अंतिम निष्कर्ष स्पष्ट होतील. त्यामुळे शासनाच्या निलंबन आदेशाने आरोग्य विभागात निर्माण झालेल्या या प्रकरणाच्या पुढील चौकडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!