Home Breaking News गणेशोत्सव भक्तिभावाने, शांततेत व उत्साहात साजरा करा — नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर...

गणेशोत्सव भक्तिभावाने, शांततेत व उत्साहात साजरा करा — नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर

0
18
Oplus_131072

गणेशोत्सव भक्तिभावाने, शांततेत व उत्साहात साजरा करा — नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर

गणेशोत्सवानिमित्त गडचिरोलीकरांना आवाहन; स्वच्छता, पर्यावरण संवर्धनासह सामाजिक सलोखा जपण्याचा दिला संदेश

प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करा; विसर्जनावेळी स्वच्छता राखून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

गडचिरोली : गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. गडचिरोली शहरातील सर्व नागरिक व गणेश मंडळांनी हा उत्सव भक्तिमय वातावरणात, शांततेत आणि उत्साहाने साजरा करून शहराची सामाजिक व सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध करावी, असे आवाहन नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी केले आहे.

गणेशोत्सवानिमित्त शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी श्री गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा निंबोरकर यांनी शहरवासीयांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

“गणपती बाप्पा हे बुद्धी, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात बंधुभाव, एकोपा आणि सकारात्मकतेचा संदेश पोहोचला पाहिजे. प्रत्येकाने उत्सवाचा आनंद घेताना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक शिस्तीची काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.

गणेश मंडळांनी उत्सवाच्या काळात धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व जनजागृतीपर उपक्रमांना प्राधान्य द्यावे. तसेच नागरिकांनी व गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकांचा अतिरेक टाळावा, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी आणि उत्सवाचे पावित्र्य व शांतता कायम राखावी, असेही त्यांनी सांगितले.

यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा. सजावटीसाठी शक्यतो पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा आणि प्लास्टिकचा वापर टाळावा. श्रींच्या विसर्जनावेळी निर्माल्य व इतर साहित्य रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावावी. विसर्जन स्थळांवर स्वच्छता आणि शिस्त राखून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही नगराध्यक्षा निंबोरकर यांनी केले.

“गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना आपल्या शहराची स्वच्छता आणि पर्यावरणाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. आपला उत्सव इतरांसाठी त्रासदायक न ठरता सामाजिक एकोप्याचा आदर्श निर्माण करणारा असावा,” असा संदेश त्यांनी दिला.

“श्री गणरायाच्या कृपेने गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, प्रत्येक कुटुंबात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदावे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे,” अशा शब्दांत नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी समस्त गडचिरोलीकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!