Home Breaking News गडचिरोलीत जिल्हास्तरीय सीनियर लॅक्रोस निवड चाचणी उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

गडचिरोलीत जिल्हास्तरीय सीनियर लॅक्रोस निवड चाचणी उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

0
14

गडचिरोलीत जिल्हास्तरीय सीनियर लॅक्रोस निवड चाचणी उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

निवड झालेले खेळाडू नागपूर येथील राज्यस्तरीय लॅक्रोस बॉक्स स्पर्धेत गडचिरोलीचे प्रतिनिधित्व करणार

ऑलिंपिकमध्ये समावेश झालेल्या लॅक्रोस खेळाला दुर्गम गडचिरोलीत वाढता प्रतिसाद; भविष्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्याची आशा

गडचिरोली, दि. 29 ऑगस्ट 2026 : महाराष्ट्र लॅक्रोस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा लॅक्रोस संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय सीनियर मुले व मुली लॅक्रोस खेळाची निवड चाचणी दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उत्स्फूर्त वातावरणात पार पडली.

या निवड चाचणीला गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांतून मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या निवड चाचणीच्या आयोजनासाठी महाराष्ट्र लॅक्रोस असोसिएशनचे सचिव श्री. मोहम्मद बाबर तसेच गडचिरोली नगरपरिषदेचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती श्री. लीलाधर भरडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. घटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गडचिरोली जिल्हा लॅक्रोस संघटनेचे सचिव श्री. संदीप पैदापल्ली, उपाध्यक्ष श्री. नितेश कंकनालवार, लॅक्रोस प्रशिक्षक श्री. अनुराग कुडकावार व श्री. राकेश बच्चलवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

निवड चाचणीदरम्यान खेळाडूंचे कौशल्य, शारीरिक क्षमता, खेळातील कामगिरी आणि तांत्रिक बाबींचे परीक्षण करण्यात आले. त्याआधारे जिल्ह्याच्या मुलांच्या व मुलींच्या संघाची निवड करण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंना आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या दृष्टीने विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दि. 2 ते 4 सप्टेंबर 2026 दरम्यान नागपूर येथे आयोजित दुसऱ्या सीनियर लॅक्रोस बॉक्स राज्यस्तरीय स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे निवड झालेले मुलांचे व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळाडू सज्ज झाले असून, संघटनेचे पदाधिकारी व प्रशिक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

2028 ऑलिंपिककडे गडचिरोलीच्या खेळाडूंची वाटचाल”

विशेष म्हणजे, लॅक्रोस या वेगवान आणि कौशल्यपूर्ण खेळाचा लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या 2028 ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या खेळाचे महत्त्व आणखी वाढले आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल व दुर्गम जिल्ह्यातही लॅक्रोसकडे युवक-युवतींचा वाढता कल दिसून येत असल्याने जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंसाठी भविष्यात मोठी संधी निर्माण होऊ शकते.

योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि सातत्यपूर्ण स्पर्धात्मक संधी उपलब्ध झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातून राज्य व राष्ट्रीय स्तरासोबतच भविष्यात ऑलिंपिकच्या मैदानावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे लॅक्रोसपटू घडू शकतात, असा विश्वास यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!