
भाजपा महिला मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न; महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा! जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे
महिला मोर्चाची बूथस्तरावर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आवाहन; शासनाच्या महिला कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर भर
गडचिरोली, दि. १९ : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार सौ. चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार भाजपा महिला मोर्चा, गडचिरोली जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत महिला मोर्चाच्या संघटनात्मक कामकाजासह आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महिला मोर्चा प्रदेश महामंत्री तथा जिल्हा प्रभारी श्रीमती अल्काताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस माजी खासदार अशोक नेते , भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, आणि प्रदेश महिला मोर्चा जिल्हा सचिव रेखा डोळस, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे म्हणाले की, महिला शक्ती ही भाजपा संघटनेची मोठी ताकद असून, संघटनेच्या विस्तारात महिला कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक बूथपर्यंत महिला मोर्चाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातत्याने संपर्क वाढवावा. केंद्र व राज्य शासनाच्या महिला कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी प्रभावी दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी बूथस्तरावरील महिला कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे गरजेचे आहे. समाजातील विविध घटकांशी सातत्याने संपर्क ठेवत महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. संघटनात्मक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही महिला मोर्चाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही रमेशजी बारसागडे यांनी सांगितले. पक्ष संघटना मजबूत करणे, बूथस्तरावर महिला कार्यकर्त्यांचे जाळे बळकट करणे तसेच आगामी संघटनात्मक अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामकाजाबाबत आपली मते मांडली. आगामी काळात महिला मोर्चाच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर उपक्रम, सामाजिक कार्यक्रम तसेच पक्षाच्या संघटनात्मक अभियानांना व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार करण्यात आला.
नगराध्यक्षा अँड प्रणोती सागर निंबोरकर, जिल्हा प्रभारी तथा जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, लता पूघांटी, अर्चना बोरकुटे, प्रिती शभरकर, शालीणी पोहनकर, प्रमोद पिपरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महिला मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगराध्यक्ष, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








