Home गडचिरोली पदवीधर मतदार नोंदणीसह प्रत्येक बूथ मजबूत करा: संघटन बळकटीसाठी गावागावात पोहोचा –...

पदवीधर मतदार नोंदणीसह प्रत्येक बूथ मजबूत करा: संघटन बळकटीसाठी गावागावात पोहोचा – प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण यांचे आवाहन; जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वात बैठक

0
24

पदवीधर मतदार नोंदणीसह प्रत्येक बूथ मजबूत करा: संघटन बळकटीसाठी गावागावात पोहोचा – प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण यांचे आवाहन; जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वात बैठक

भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या नेतृत्वात देसाईगंज येथे पदवीधर निवडणूक आढावा बैठक संपन्न

गडचिरोली:| दि. १२ ऑगस्ट २०२६

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर मतदार नोंदणी, बूथनिहाय संघटनात्मक कामकाज आणि पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आढावा बैठक देसाईगंज (वडसा) येथील सांस्कृतिक भवनात भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या नेतृत्वात संपन्न झाली.

बैठकीच्या प्रारंभी धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याबद्दल उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या.

बैठकीत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर मतदार नोंदणी दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. प्रत्येक पात्र पदवीधर मतदारापर्यंत कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि मतदार नोंदणीची प्रक्रिया प्रभावीपणे राबवावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. चव्हाण यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक करताना, भाजपा कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने संघटनेच्या विचारधारेशी जोडलेले आहेत, ही पक्षाची खरी ताकद असल्याचे नमूद केले. विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संघटितपणे काम करण्याची गरज असून, पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक गाव आणि प्रत्येक बूथपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचावे, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत जिल्ह्यातील सर्व बूथवरील संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला. आगामी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी, बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांशी संपर्क आणि संघटन विस्तार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. सरकारच्या योजना, विकासकामे आणि जनहिताचे निर्णय यांची वस्तुनिष्ठ माहिती नियमितपणे नागरिकांपर्यंत पोहोचवावी, तसेच समाजात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या माहितीला तथ्यांच्या आधारे उत्तर द्यावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.

भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा आढावा मांडला. पदवीधर मतदार नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, विदर्भ संयोजक दिनेशजी सूर्यवंशी, विदर्भ सहसंयोजक प्रवीणजी दटके, सुधाकरजी कोहळे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, विधानपरिषद सदस्य आ. संजयजी भेंडे, विधानपरिषद सदस्य आ. अरुणजी लखानी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी बंटीभाऊ भांगडिया, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णाजी गजभे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, गडचिरोली लोकसभा प्रमुख किसन नागदेवे, नगराध्यक्ष प्रणोतीताई निंबोरकर, नगराध्यक्ष लताताई सुंदरकर, नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, अर्चनाताई डहाणकर, रेखाताई डोळस, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा नोंदणी प्रमुख प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे, महामंत्री सदानंदजी कुथे, महामंत्री प्रकाश गेडाम, अल्पसंख्याक आघाडीचे नेते बबलू भाई हुसैनी, आरमोरी विधानसभा नोंदणी प्रमुख मोतीभैया कुकरेजा, भारतभाऊ बावणथडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पदवीधर मतदार नोंदणीसोबतच बूथ पातळीवरील संघटन अधिक मजबूत करून आगामी काळातील निवडणुकांसाठी पक्षाची यंत्रणा सज्ज करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!