
नवनीत ग्राम पहाडीच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध : डॉ. प्रणय खुणे
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्या मागणीची जिल्हा परिषदेकडून दखल
घोट | दि. १० ऑगस्ट २०२६
रेगडी-हळदवाही व जिल्हा परिषद क्षेत्रातील नवनीत ग्राम पहाडीच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असून, या पर्यटनस्थळाला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी केले.
नवनीत ग्राम पहाडी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नवनीत ग्राम शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानु भाऊ उपाध्ये, विदर्भ केसरी वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी फुलचंद वाघाडे, दिनेश मुजुमदार, संदीप भोवरे, प्रवीण गेडाम, पलाश घरामी, रमेश लेकलवार यांच्यासह श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रणय खुणे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजप्रबोधन, ग्रामविकास आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असून, आजच्या काळात राष्ट्रसंतांच्या विचारांची देशाला नितांत गरज आहे.
कार्यक्रमादरम्यान गुरुदेव भक्त व आयोजकांनी नवनीत ग्राम पहाडी परिसरातील विविध समस्या डॉ. खुणे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर डॉ. खुणे यांनी गुरुदेव भक्तांसोबत पहाडी परिसराची पाहणी करून उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. परिसराच्या विकासासाठी सर्वप्रथम या पर्यटनस्थळाला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नवनीत ग्राम पहाडीच्या विकासाबाबत गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे तसेच वनपरिक्षेत्राधिकारी वाडीघरे यांच्याशी डॉ. खुणे यांनी भ्रमणध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. यापूर्वी डॉ. प्रणय खुणे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या ठिकाणी आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे.
डॉ. प्रणय खुणे यांच्या मागणीनुसार आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी नवनीत ग्राम पहाडी येथे बोरवेल मंजूर केली आहे. तसेच नवनीत ग्राम पहाडीच्या विकासासाठी डॉ. खुणे यांनी नुकतीच जिल्हा परिषद गडचिरोलीकडे विविध विकासकामांची मागणी केली होती. या मागणीची जिल्हा परिषदेने दखल घेतली असून, त्यासंदर्भातील पत्र पंचायत समिती चामोर्शी यांना पाठविण्यात आले आहे.
नवनीत ग्राम पहाडीचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासोबतच या भागाला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळू शकते. त्यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा विश्वास डॉ. प्रणय खुणे यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे विश्वस्त नोनीगोपाल हलदर तसेच नवनीत ग्राम पहाडी आणि ग्रामपंचायत हळदवाही अंतर्गत विविध गावांतील गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.








