Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक निर्णय; १०० प्रवेश क्षमतेच्या नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयाला...

गडचिरोली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक निर्णय; १०० प्रवेश क्षमतेच्या नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयाला मंजुरी

0
4

गडचिरोली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक निर्णय; १०० प्रवेश क्षमतेच्या नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयाला मंजुरी

 

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्राला नवी दिशा

 

गडचिरोली | प्रतिनिधी

 

गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत आनंदाची व अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने १०० प्रवेश क्षमतेच्या नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयास मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार आहे. अनेक वर्षांपासून जिल्ह्यात अशा महाविद्यालयाची आवश्यकता व्यक्त केली जात होती. अखेर या मागणीला यश मिळाल्याने विद्यार्थी, पालक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

या महत्त्वपूर्ण मंजुरीसाठी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. विविध स्तरांवर बैठका, प्रस्ताव सादर करणे तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून त्यांनी हा विषय प्राधान्याने मांडला. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.

 

नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय सुरू झाल्यानंतर दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नर्सिंग शिक्षणासाठी नागपूर, चंद्रपूर, गोंदिया किंवा इतर शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. स्थानिक स्तरावरच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी होईल, तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी मिळणार आहे.

 

या महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळ तयार होईल. भविष्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच खासगी आरोग्य संस्थांमध्ये कुशल नर्सिंग कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढेल. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता अधिक उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. यासोबतच स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन आर्थिक विकासालाही चालना मिळेल.

 

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गडचिरोलीमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होण्याबरोबरच आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रांना या निर्णयाचा दीर्घकालीन लाभ होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

 

या ऐतिहासिक निर्णयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मितीच्या विविध योजनांसाठी भविष्यातही सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यात शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना ही केवळ एका शैक्षणिक संस्थेची मंजुरी नसून, जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्था, वैद्यकीय शिक्षण, युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याची भावना नागरिक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हा निर्णय गडचिरोलीच्या प्रगतीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असल्याचेही बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!