
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या अविरत देशसेवेबद्दल सेमाना देव येथे विशेष पूजा-अर्चना; देशाच्या प्रगतीसाठी व दीर्घायुष्यासाठी सामूहिक प्रार्थना
गडचिरोली:देशाच्या विकासाला नवी दिशा देणारे नेतृत्व, जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला नवी ऊर्जा देणारे मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री पदावरील १२ वर्षांच्या यशस्वी, जनाभिमुख व अविरत देशसेवेच्या कार्यकाळानिमित्त गडचिरोली येथे विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे आणि गडचिरोली नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोळकर यांच्या वतीने सेमाना देवस्थान येथे विशेष पूजा-अर्चना व प्रार्थना कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमादरम्यान सेमाना देवाच्या चरणी देशाच्या अखंड प्रगतीसाठी, जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, निरोगी जीवन व दीर्घायुष्य लाभावे, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. उपस्थितांनी भारत अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहावा, अशी भावना व्यक्त करत “विकसित भारत” या राष्ट्रीय संकल्पनेच्या यशस्वी पूर्ततेसाठी ईश्वरचरणी प्रार्थना अर्पण केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला. पायाभूत सुविधा विकास, सामाजिक कल्याणकारी योजना, ग्रामीण भागातील विकास, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, आर्थिक सक्षमीकरण आणि देशाच्या जागतिक प्रतिष्ठेत झालेली वाढ यामुळे भारत अधिक आत्मविश्वासाने पुढे जात असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
मोदीजींच्या खंबीर, दूरदृष्टीपूर्ण आणि विकासाभिमुख नेतृत्वात भारत आगामी काळात प्रगतीची नवी शिखरे गाठेल, जगातील अग्रगण्य राष्ट्रांच्या पंक्तीत अधिक सक्षमपणे उभा राहील आणि विकसित भारताचे स्वप्न निश्चितपणे साकार होईल. देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाचे फायदे पोहोचावेत आणि भारत अधिक आत्मनिर्भर, सक्षम व समृद्ध व्हावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी राष्ट्रहित सर्वोच्च मानून समाजहित आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी गडचिरोली भाजपा शहर महामंत्री तथा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष निखिल चरडे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरपरिषद बांधकाम सभापती अनिल कुणघाडकर, माजी पंचायत समिती सभापती विलास दशमुखे, नगरपरिषद शिक्षण सभापती हर्षल गेडाम, कृऊबा संचालक हेमंत बोरकुटे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी “विकसित भारत – सक्षम भारत – आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेला बळ देत देशाच्या उज्ज्वल, समृद्ध आणि सक्षम भविष्याची कामना व्यक्त केली.








