Home गडचिरोली चामोर्शीत जनआक्रोशाचा ज्वालामुखी!”त्या चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशी द्या” – हजारो महिलांचा...

चामोर्शीत जनआक्रोशाचा ज्वालामुखी!”त्या चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशी द्या” – हजारो महिलांचा संतप्त हुंकार

0
11

चामोर्शीत जनआक्रोशाचा ज्वालामुखी!”त्या चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशी द्या” – हजारो महिलांचा संतप्त हुंकार

 

चामोर्शी प्रतींनिधी : अवघ्या सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण चामोर्शी हादरून गेले आहे. या हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेच्या निषेधार्थ ११ जून रोजी शहरात अभूतपूर्व जनआक्रोश उसळला. हजारो महिला, युवक, नागरिक, सामाजिक संघटना, व्यापारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आणि सर्वत्र एकच मागणी घुमत होती – “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे आणि आरोपीला फाशी झालीच पाहिजे!” या घटनेने प्रत्येक आईच्या काळजाचा ठाव घेतला आहे. ज्या वयात एखादी मुलगी खेळण्यांशी खेळत असते, स्वप्नांच्या दुनियेत रमलेली असते, त्या वयात तिच्यावर असा अमानुष अत्याचार होणे ही संपूर्ण समाजासाठी शरमेची बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

लक्ष्मी गेटपासून हजारो महिलांनी हातात फलक घेऊन पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. “आरोपीला फाशी द्या”, “मुलींना सुरक्षितता द्या”, “न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. महिलांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात संताप स्पष्ट दिसत होता. ८ जून रोजी चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घृणास्पद घटना घडली. घराला रंग देण्यासाठी आलेल्या प्रज्वल उर्फ नारू सदाशिव भांडेकर (२५) याने या निष्पाप बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.

“एसपी येईपर्यंत माघार नाही”

मोर्चा पोलिस ठाण्यावर पोहोचताच आंदोलक महिलांनी ठाम भूमिका घेतली की, “जोपर्यंत पोलिस अधीक्षक स्वतः येथे येत नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.” वाढता जनक्षोभ आणि संतप्त वातावरण पाहता पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी तातडीने चामोर्शी गाठले. त्यांनी पीडित कुटुंबीय, महिला प्रतिनिधी आणि आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. तपासाची माहिती देत ३० दिवसांच्या आत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल तसेच आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक शांत झाले.

न्यायासाठी शिष्टमंडळाचे निवेदन

नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, नगरसेविका अॅड. प्रेमा आईंचवार, वंदना चौथाले, वंदना म्हस्के, नगरसेवक राहुल नैताम, अमोल आईचवार, अॅड. डिंपल उंदिरवाडे, सामाजिक कार्यकर्ते माणिक तुरे यांच्यासह विविध मान्यवरांनी पोलिस अधीक्षक, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत पीडितेला तातडीने न्याय देण्याची मागणी केली.

 

डॉक्टरांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

पीडित बालिकेच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान काही डॉक्टरांकडून हलगर्जीपणा आणि दिरंगाई झाल्याचा गंभीर आरोप महिला संघटनांनी केला. या आरोपांमुळे प्रशासनाचीही कोंडी झाली आहे. यावर पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणताही अधिकारी किंवा डॉक्टर दोषी आढळल्यास त्याच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल.”

 

समाजाला हादरवणारा प्रश्न

आज चामोर्शीतील प्रत्येक आई, प्रत्येक बहीण आणि प्रत्येक नागरिक एकच प्रश्न विचारत आहे – “निष्पाप चिमुकल्यांचे बालपण हिरावून घेणाऱ्या अशा नराधमांना कठोर शिक्षा कधी मिळणार?” या घटनेने केवळ एका कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे मन हेलावून टाकले आहे. पीडित चिमुरडीच्या वेदना आणि तिच्या कुटुंबाचा आक्रोश शब्दांत व्यक्त होणे अशक्य आहे. आता संपूर्ण चामोर्शीची एकच अपेक्षा आहे – न्याय जलद व्हावा, दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!