
गट ग्रामपंचायत दर्शनी माल येथे निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम उत्साहात संपन्न
गडचिरोली, दि. १२ जून : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार गडचिरोली तालुक्यातील फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत गट ग्रामपंचायत दर्शनी माल येथे आज सकाळी १० वाजता आरक्षण निश्चिती संदर्भातील मार्गदर्शन व माहितीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मुंबई ग्रामपंचायत (सदस्य संख्या, प्रभाग रचना व जागांचे आरक्षण) नियम, १९६६ नुसार आयोजित या कार्यक्रमात मंडळ अधिकारी खेमराज लेनगुरु यांनी उपस्थित नागरिकांना ग्रामपंचायतींची सदस्य संख्या, प्रभाग रचना, जागांचे आरक्षण तसेच आरक्षण निश्चितीची संपूर्ण प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. निवडणूक प्रक्रियेतील नियम, तरतुदी व आरक्षण सोडतीची पद्धत सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजावून सांगत त्यांनी उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमास महसूल अधिकारी आर. एम. वासनिक (येवली), ग्रामविकास अधिकारी डी. एस. उईके, प्रशासक श्रीमती यशोदा बोबाटे, पोलीस पाटील धोंडूजी उडान, लोमेश कुळमेथे (WH News जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली), माजी उपसरपंच कालिदास सातपुते व विनोद सातपुते, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शंकर उडान, ज्येष्ठ नागरिक कवडूजी मशाखेत्री, ग्रामपंचायत शिपाई बंडू उडान, संगणक चालक साईनाथ भोयर, महसूल सेवक कर्मवीर कोठारे, किसन उडान, चरदास पिपरे (माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष), सुरेश कन्नाके, मणिराम उडान, विश्वनाथ वासेकर, संतोष पिपरे, नागेश उडान यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीतील आरक्षण प्रक्रिया ही पूर्णतः पारदर्शक, नियमबद्ध व लोकशाही मूल्यांनुसार राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबी जाणून घेतल्या. कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात आणि नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न झाला.
निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग आणि जनजागृती वाढविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








