Home गडचिरोली घनकचरा शेडच्या नावाखाली सरकारी पैशांची उधळण? — दर्शनी (माल) ग्रामपंचायतीत ₹1.52 लाखांचा...

घनकचरा शेडच्या नावाखाली सरकारी पैशांची उधळण? — दर्शनी (माल) ग्रामपंचायतीत ₹1.52 लाखांचा कथित घोटाळा”

0
25

“घनकचरा शेडच्या नावाखाली सरकारी पैशांची उधळण? — दर्शनी (माल) ग्रामपंचायतीत ₹1.52 लाखांचा कथित घोटाळा”

काम अपूर्ण, सुविधा गायब; मात्र कागदावर शेड ‘पूर्ण’ — ग्रामस्थांचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप

गडचिरोली प्रतिनिधी :- केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाला गट ग्रामपंचायत दर्शनी (माल) येथेच हरताळ फासल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गावातील घनकचरा व्यवस्थापन शेडच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, निकृष्ट दर्जाचे काम आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी लंपास केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये जोर धरत आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, संबंधित घनकचरा शेडचे काम प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही मोजमाप पुस्तिका (MB) व इतर कागदपत्रांमध्ये काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. या माध्यमातून तब्बल ₹1 लाख 52 हजार रुपयांचा आर्थिक अपहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर चौकशीही करण्यात आली. मात्र चौकशीत मंजूर अंदाजपत्रकातील कामे आणि प्रत्यक्षात उभारण्यात आलेल्या कामामध्ये मोठी तफावत आढळून आल्याचे सांगितले जात असतानाही, संबंधित दोषींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, घनकचरा व्यवस्थापन शेडमध्ये ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक व काच यांचे स्वतंत्र वर्गीकरण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच जाळीदार दरवाजा, भिंतींवरील प्लास्टर, संरक्षक बांधकाम आणि इतर मूलभूत कामेही अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ग्रामस्थांच्या मते, प्रत्यक्षात झालेल्या कामाची किंमत अवघी ₹30 ते ₹35 हजारांच्या आसपास असू शकते. दरम्यान, गावातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या आणि अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरत असून, शासनाच्या स्वच्छता अभियानाचा उद्देशच धुळीस मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात चौकशी होऊन अनेक महिने उलटून गेले तरी दोषींवर कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “चौकशी फक्त कागदावर आणि कारवाई मात्र शून्य” अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे.
या संदर्भात माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज सुरेश उराडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे संबंधित दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गैरव्यवहाराची रक्कम वसूल करून गावात दर्जेदार व प्रभावी घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था उभारण्यात यावी, अन्यथा न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ग्रामस्थांची मागणी स्पष्ट आहे “भ्रष्टाचार झाकण्याऐवजी दोषींना शिक्षा करा आणि स्वच्छ भारत अभियानाला न्याय द्या!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!