
पातागुडमच्या जंगलात तेंदूपान तोडणी अचानक बंद; कंत्राटदाराच्या निर्णयाने शेकडो आदिवासी कुटुंबांवर उपासमारीचे संकट
“तेंदूपानाच्या हिरव्या पानांवर आदिवासींच्या अश्रूंची सावली
गडचिरोली प्रतिनिधी:- गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला, दाट जंगलाच्या कुशीत वसलेले पातागुडम हे छोटेसे आदिवासी गाव आज वेदना, संताप आणि असहायतेने तडफडत आहे. जंगलातील तेंदूपान हेच येथे हजारो गरीब आदिवासींच्या जगण्याचे साधन, मुलांच्या शिक्षणाची आशा आणि वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार मानले जाते. मात्र याच तेंदूपानावर आता अन्यायाचे काळेकुट्ट ढग दाटून आले असून, कंत्राटदाराच्या एका निर्णयामुळे शेकडो कुटुंबांच्या घरातील चूल विझण्याची वेळ आली आहे. पातागुडम परिसरात ग्रामकोश समितीमार्फत कंत्राटदारासोबत तब्बल 1194 गोण्या म्हणजे अंदाजे 13 लाख पुड्या तेंदूपान खरेदीचा करार करण्यात आला होता. प्रति पुडी 14 रुपये 15 पैसे दर निश्चित करण्यात आला. या करारावर विश्वास ठेवून गावातील महिला, पुरुष आणि अगदी लहान मुलांनीसुद्धा कडक उन्हात जंगल पिंजून तेंदूपान गोळा करण्यास सुरुवात केली. अवघ्या चार दिवसांत सुमारे तीन लाख पुड्या तेंदूपान तोडण्यात आले.
मात्र अचानक कंत्राटदाराने “पाने दर्जाहीन व नापसंतीची आहेत” असे कारण पुढे करत तोडणी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण गावावर आर्थिक संकटाचे वादळ कोसळले.
आज ज्यांच्या हातात हिरवीगार पाने होती, त्या हातात निराशा आहे… डोळ्यांत अश्रू आहेत… आणि उद्याच्या उपासमारीची भीती आहे. अनेक कुटुंबांनी तेंदूपानाच्या मोबदल्यावर मुलांच्या शाळेची फी, आजारी आई-वडिलांचे औषधोपचार आणि वर्षभराच्या अन्नधान्याची आशा बांधली होती. पण कंत्राटदाराच्या अचानक घेतलेल्या निर्णयाने त्या आशांवर अक्षरशः पाय दिल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, पातागुडम हे गाव पेसा कायद्यांतर्गत संरक्षित क्षेत्रात येते. त्यामुळे ग्रामसभा आणि आदिवासी हक्कांना येथे विशेष कायदेशीर संरक्षण आहे. करारनाम्यानुसार संपूर्ण तेंदूपान खरेदी करणे बंधनकारक असताना अचानक खरेदी थांबविणे हे केवळ करारभंग नसून आदिवासींच्या हक्कांवर घाला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदारावर पेसा कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून करारनाम्यानुसार संपूर्ण पैसे अदा करावेत, अशी तीव्र मागणी केली आहे.
या आंदोलनाला “माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र समिती” ने देखील जाहीर पाठिंबा दिला आहे. समितीचे तालुका अध्यक्ष देवेंद्रकुमार रंगू यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, “करारनाम्यानुसार संपूर्ण खरेदी झाली नाही, तर आदिवासींच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल. जंगलात रक्ताचे पाणी करून घाम गाळणाऱ्या मजुरांच्या श्रमांची थट्टा आम्ही सहन करणार नाही. आदिवासींच्या पोटावर लाथ मारणाऱ्यांविरोधात कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा उभारला जाईल.”
दरम्यान, सिरोंचा तालुका पेसा अधिकारी श्री कडुकर यांनी सांगितले की,
“करारनाम्यानुसार 1194 गोण्या तेंदूपान खरेदी करणे अनिवार्य आहे. घटनास्थळी मौका पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.”
यावर समितीचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज उराडे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटले की, “पातागुडमसारख्या दुर्गम आदिवासी गावांमध्ये तेंदूपान हे केवळ जंगलातील पान नसून, तेथील गरीब कुटुंबांचा श्वास आहे. त्या पानांवर मुलांचे शिक्षण, आजारी आई-वडिलांचे औषध आणि वर्षभराच्या अन्नाची आशा टिकून असते. आज कंत्राटदाराच्या निर्णयामुळे अनेक घरांतील चूल विझण्याची वेळ आली आहे. जंगलात उन्हातान्हात राबणाऱ्या आदिवासी मजुरांच्या डोळ्यांतील अश्रू प्रशासनाने पाहिले पाहिजेत.” ते पुढे म्हणाले, “पेसा कायदा हा आदिवासींच्या संरक्षणासाठी आहे, केवळ कागदावर ठेवण्यासाठी नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून प्रत्येक मजुराला करारनाम्यानुसार न्याय व हक्काचे पैसे मिळवून द्यावेत. अन्यथा हा अन्याय केवळ काही कुटुंबांवर नाही, तर संपूर्ण आदिवासी समाजाच्या अस्तित्वावर घाव ठरेल.”
दरम्यान, पातागुडमच्या जंगलात आजही तेंदूपानाच्या पुड्या पडून आहेत… पण त्या हिरव्या पानांवर आता श्रमाचा सुगंध नाही, तर आदिवासींच्या अश्रूंची सावली दाटून आलेली दिसत आहे.








