
गडचिरोली शहरातील कोणताही प्रभाग विकासापासून वंचित राहानार नाही_ नगराध्यक्ष अॅड प्रणोती निंबोरकर यांचा निर्धार
नगरोन्नती व दलित वस्ती योजनेंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन
गडचिरोली | दि. 18 एप्रिल 2026 :
गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नगरोन्नती व दलित वस्ती योजनेंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ नगरपरिषद गडचिरोलीच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर उपाध्यक्ष निखिल चरडे,बां. स. अनिल कुनघाळकर,नगरसेवक यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते बांधकाम व दुरुस्ती, नाली बांधकाम, , स्वच्छता सुविधा तसेच इतर मूलभूत नागरी सोयीसुविधांच्या उभारणीसाठी कामांना प्रारंभ करण्यात आला. यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर म्हणाल्या की, “गडचिरोली शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे नगरपरिषदेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. नगरोन्नती व दलित वस्ती योजनांच्या माध्यमातून शहरातील सर्व प्रभागांचा समतोल व सर्वसमावेशक विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणताही भाग विकासापासून वंचित राहू नये, यासाठी नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने कामे राबवली जात आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “सुरू करण्यात आलेली सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण, वेळेत आणि नागरिकांच्या अपेक्षांनुसार पूर्ण करण्यात येतील. नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे हेच आमचे ध्येय आहे.”
उपाध्यक्ष निखिल चरडे,बांधकाम सभापती अनिल कुनघाळकर तसेच नगरसेवक, पदाधिकारी, नगरपरिषद कर्मचारी तसेच संबंधित प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या विकासकामांच्या शुभारंभाबद्दल समाधान व्यक्त करत नगरपरिषदेच्या पुढाकाराचे स्वागत केले.
या कामांमुळे गडचिरोली शहरातील रस्ते, नाली व्यवस्था, पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असून नागरिकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ व सोयीस्कर नागरी जीवनाचा अनुभव मिळणार आहे. परिणामी, शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला निश्चितच गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.








