Home गडचिरोली गडचिरोली विश्राम भवन बांधकामात गंभीर गैरप्रकार ?मुरूम ऐवजी र्जजर इमारतीचा मलबा वापरल्याच्या...

गडचिरोली विश्राम भवन बांधकामात गंभीर गैरप्रकार ?मुरूम ऐवजी र्जजर इमारतीचा मलबा वापरल्याच्या आरोप

0
50

गडचिरोली विश्राम भवन बांधकामात गंभीर गैरप्रकार ?मुरूम ऐवजी र्जजर इमारतीचा मलबा वापरल्याच्या आरोप….

गडचिरोलीत विश्राम भवन बांधकामावर गंभीर आरोप; झाडतोड प्रकरणानंतर आता निकृष्ट साहित्य वापर?

गडचिरोली शहरात सुरू असलेल्या विश्राम भवनाच्या बांधकामाभोवती एकामागोमाग एक गंभीर बाबी समोर येत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या झाडतोडीच्या प्रकरणाची चौकशी अद्यापही प्रलंबित असताना, आता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप पुढे आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू होण्यापूर्वी या परिसरातील सुमारे ३० ते ४० वर्षे जुनी, मोठ्या आकाराची झाडे तोडण्यात आली होती. यात सुमारे आठ शिसम (शिशम) झाडांसह अनेक मौल्यवान वृक्षांचा समावेश होता. विशेष म्हणजे ही झाडतोड केवळ नाममात्र ७८ हजार रुपये नगरपालिकेला भरून करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाची अद्याप कोणतीही सखोल चौकशी झालेली नाही, ही बाब अधिकच चिंताजनक ठरत आहे.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या विश्राम भवनाच्या बांधकामात मुरूमाऐवजी जुन्या जर्जर सरकारी इमारतीचा मलबा फाउंडेशनमध्ये टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील जुने सरकारी निवासस्थान जेसीबीच्या सहाय्याने पाडून त्याचा मलबा थेट बांधकामस्थळी आणून वापरला जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

हे सर्व प्रकार अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय परिसरात घडत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. संबंधित बांधकामाच्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तरीदेखील अशा प्रकारचा गलथान कारभार सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदार हा प्रभावशाली व राजकीय पाठबळ असलेला असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार यांच्यातील संगनमताबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.

शासनाकडून गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात असताना, अशा प्रकारे निकृष्ट साहित्याचा वापर आणि मनमानी कारभार होत असल्यास शासनाच्या निधीचे किती मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल, याचा विचार न केलेलाच बरा, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

एकीकडे झाडतोडीचे प्रकरण अद्याप चौकशीअभावी प्रलंबित आहे, तर दुसरीकडे बांधकामातच दर्जाहीन साहित्य वापरल्याच्या आरोपांमुळे संपूर्ण प्रकल्पावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित बांधकामाची गुणवत्ता तपासावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!