Home गडचिरोली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ३२ वे गडचिरोली जिल्हा अधिवेशन उत्साहात; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी...

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ३२ वे गडचिरोली जिल्हा अधिवेशन उत्साहात; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – प्रा. रमेशजी बारसागडे

0
21

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ३२ वे गडचिरोली जिल्हा अधिवेशन उत्साहात; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – प्रा. रमेशजी बारसागडे

 

गडचिरोली:महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे आयोजित ३२ वे गडचिरोली जिल्हा अधिवेशन रविवारी (दि. १५ मार्च २०२६) रोजी गडचिरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायभवन कॉम्प्लेक्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या शिक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडले. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या घडामोडी, शिक्षकांच्या समस्या, शैक्षणिक धोरणे तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी आवश्यक उपाययोजनांवर या अधिवेशनात सखोल चर्चा करण्यात आली.

अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा. रमेशजी बारसागडे (जिल्हाध्यक्ष, भाजपा गडचिरोली) यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षक परिषद ही उत्तम शिक्षक घडविणारी आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारी प्रभावी संघटना आहे.” गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

प्रा. बारसागडे पुढे म्हणाले की, आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान, आधुनिक अध्यापन पद्धती आणि बदलत्या शैक्षणिक धोरणांची माहिती आत्मसात करून विद्यार्थ्यांना सक्षम, सजग व जबाबदार नागरिक बनविण्याचे कार्य करणे गरजेचे आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून शिक्षक हा त्या परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अधिवेशनाचे उद्घाटन माजी खासदार मा. अशोक नेते यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अनिल नुतीलकंठावार (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली) होते. स्वागताध्यक्ष म्हणून आमदार मा. डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थितांचे स्वागत करत शिक्षक परिषदेच्या कार्याचे कौतुक केले व शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला मा. नागो गाणार (माजी आमदार वि.प.स. व राज्य कार्याध्यक्ष), मा. पुजाताई चौधरी (राज्य महिला आघाडी प्रमुख), मा. देवरावजी होळी (माजी आमदार), मा. डॉ. सचिन मडावी (सहआयुक्त, समाज कल्याण विभाग गडचिरोली) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

तसेच मा. अजय वानखेडे (अध्यक्ष, नागपूर विभाग), मा. शुभाष गोतमारे (कार्यवाह, नागपूर विभाग), मा. संतोष सुरावार (कोषाध्यक्ष, नागपूर विभाग) यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शिक्षक प्रतिनिधी, प्राथमिक विभागाचे पदाधिकारी, तालुका कार्यकारिणी सदस्य, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिवेशनादरम्यान शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कौशल्य विकासासाठी आवश्यक उपक्रम राबविणे तसेच शिक्षक संघटनेची बळकटी वाढविणे यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यामुळे शिक्षकांना आपल्या समस्या मांडण्याचे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, गडचिरोली जिल्हा शाखा यांच्या वतीने करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुका कार्यकारिणी सदस्य आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. अधिवेशनामुळे शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!