0
48

महाशिवरात्रीपूर्वी कर्रेममध्ये नाग मंदिर व बसस्थानकाजवळील हातपंप सुरू; कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या पाठपुराव्याला यश

 

एटापल्ली : ग्रामपंचायत गुरुपल्ली अंतर्गत कर्रेम गावातील नाग मंदिर तसेच एटापल्ली–आलापल्ली मार्गावरील बसस्थानकाजवळील नादुरुस्त हातपंपांमुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या दोन्ही सार्वजनिक हातपंपांमुळे गावकरी, भाविक आणि प्रवासी त्रस्त होते. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नाग मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र झाला होता.

कर्रेम गावातील नागरिकांनी एकत्र येत भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे समस्या समाधानासाठी मदत मागितली. नाग मंदिर हे मुख्य मार्गावर असल्याने येथे दररोज भाविकांची वर्दळ असते, तर बसस्थानक जंगल परिसरात असल्याने बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याविना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

नागरिकांची अडचण गांभीर्याने घेत कॉ. सचिन मोतकुरवार यांनी तात्काळ शासन-प्रशासनाशी संपर्क साधत नाग मंदिर व बसस्थानकाजवळील दोन्ही हातपंप दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी केली आणि सातत्याने पाठपुरावा केला. महाशिवरात्रीपूर्वीच प्रशासनाने दखल घेत दोन्ही ठिकाणचे हातपंप दुरुस्त करून कार्यान्वित केले.

यामुळे महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या भाविकांना तसेच बसस्थानकावर थांबणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्रेम गावातील नागरिकांनी कॉ. सचिन मोतकुरवार यांचे आभार मानत, लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर त्वरित कार्यवाही केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!