
देशव्यापी आम हडतालला आयटकचा पाठिंबा; १२ फेब्रुवारीला सिरोंचा नगरपंचायतीत सफाई काम बंद
सिरोंचा (गडचिरोली) :केंद्र सरकारने लागू केलेले कामगारविरोधी चार लेबर कोड रद्द करावेत, या प्रमुख मागणीसाठी सेंट्रल ट्रेड युनियन व संयुक्त किसान मोर्चा यांच्या संयुक्त आह्वानावरून दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी आम हडताल आयोजित करण्यात आली आहे. या आम हडतालला आयटक अहेरी विधानसभा शाखेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
या संदर्भात आयटकच्या वतीने नगरपंचायत सिरोंचा येथील मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर लेबर कोड कामगारांच्या नोकरीची सुरक्षितता, वेतन, सामाजिक सुरक्षा व संघटन स्वातंत्र्यावर घाला घालणारे असून त्याचा सर्वाधिक फटका सफाई कामगार, कंत्राटी व असंघटित क्षेत्रातील कामगारांना बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायत सिरोंचा अंतर्गत कार्यरत सफाई कामगार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी आम हडतालला समर्थन म्हणून सफाई काम बंद ठेवणार असल्याची माहिती आयटकने दिली आहे. हा निर्णय लोकशाही मार्गाने व कामगारांच्या हक्कांसाठी घेतल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कॉ सचिन मोतकुरवार अहेरी विधानसभा अध्यक्ष आयटक यांचा आदेशानुसार सदर निवेदन आयटक अहेरी विधानसभा शाखेचे सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी आणि प्रशासनाने याची दखल घेऊन सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.








