
भाजयुमो गडचिरोलीतर्फे केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ संमेलन व जिल्हा पदाधिकारी बैठक उत्साहात
दि. 10 फेब्रुवारी २०२६
गडचिरोली :
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, गडचिरोली यांच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ संमेलन व जिल्हा पदाधिकारी बैठक गडचिरोली येथे उत्साहात पार पडली. भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री. मधुकर केशवराव भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम माननीय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष क्रमांक १ येथे आयोजित करण्यात आला.
या संमेलनाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रा. रमेशजी बारसागडे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे हे होते. दीपप्रज्वलन माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णाजी गजबे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, प्रदेश सचिव किसान आघाडी रमेशजी भुरसे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, किसान आघाडी अध्यक्ष विलास पाटील भांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटनपर भाषणात प्रा. रमेशजी बारसागडे यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ बाबत सविस्तर मार्गदर्शन करताना सांगितले की, “हा अर्थसंकल्प राष्ट्रसुरक्षा, रोजगारनिर्मिती व विकास यांचा समतोल साधणारा असून प्रामाणिक करदात्याला सन्मान देणारा आहे. सीमावर्ती व नक्षलग्रस्त भागांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले असून शेतकरी व अन्नदात्यांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे.”
अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे म्हणाले की, “केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ म्हणजे युवकांच्या हातात रोजगार, देशाच्या हातात ताकद देणारा अर्थसंकल्प आहे. ‘लखपती दीदी’ योजनेद्वारे महिलांना स्वावलंबी बनविण्याचा संकल्प असून, आरोग्य सुविधा मजबूत करून देश अधिक सक्षम करण्याचा निर्धार यात दिसून येतो.”
या अर्थसंकल्पात राष्ट्रसुरक्षा, आत्मनिर्भर भारत, रोजगार, महिला सक्षमीकरण, आदिवासी व सीमावर्ती जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. यामुळे विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी भाजयुमो गडचिरोलीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेत मागील पाच वर्षांपासून सक्रिय कार्य करून नगरपरिषद निवडणुकीत यश संपादन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
सत्कारमूर्ती :
श्री. अक्षय हिमके – नगरसेवक, नगरपरिषद आरमोरी व जिल्हा महामंत्री भाजयुमो
श्री. अक्षय धकाते – नगरसेवक व उपाध्यक्ष भाजयुमो, आरमोरी
श्री. निखिल चरडे – उपाध्यक्ष, नगरपरिषद गडचिरोली
श्री. हर्षल गेडाम – शिक्षण सभापती, नगरपरिषद गडचिरोली
श्री. अनिलभाऊ कुनघाडर – बांधकाम सभापती, नगरपरिषद गडचिरोली
हा सत्कार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे व आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, संचालन जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, तर आभार प्रदर्शन जिल्हा महामंत्री पवन रामगीरकर यांनी केले.
या कार्यक्रमाला भाजयुमो जिल्हा पदाधिकारी, महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी सदस्य तसेच तालुका व शहर स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








