
बारामतीत स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची कुटुंबीयांची भावनिक भेट
शस्त्रक्रियेमुळे अंत्यसंस्कारास अनुपस्थित राहिल्याने नंतर प्रत्यक्ष जाऊन व्यक्त केली संवेदना
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे स्व. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आज बारामती येथे उपस्थित राहून स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शस्त्रक्रियेच्या कारणामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहता न आल्याची खंत व्यक्त करत, आमदार आत्राम यांनी आज प्रत्यक्ष बारामती गाठून दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्यांनी कुटुंबीयांशी सविस्तर संवाद साधत, या दुःखाच्या कठीण प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना व्यक्त केली.
स्व. अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतून समाजसेवा, विकासकार्य आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे सांगत, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचे मत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.
या श्रद्धांजली व सांत्वन भेटीप्रसंगी स्थानिक पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण असून, सर्वत्र स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत होता.








