
जगद्गगुरु संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त गडचिरोलीत भव्य उत्सव व स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न
नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांची प्रमुख उपस्थिती; समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक
गडचिरोली :
जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली येथे कुणबी समाजाच्या वतीने भव्य संत तुकाराम महाराज जयंती उत्सव तसेच स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उत्सवाच्या निमित्ताने गडचिरोली शहरातून भव्य रॅली व शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक नृत्यांच्या सादरीकरणासह निघालेल्या या शोभायात्रेत संत तुकाराम महाराजांच्या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. या शोभायात्रेमुळे गडचिरोली शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या जयंती उत्सवाच्या औचित्याने समाजोपयोगी उपक्रमांवर भर देण्यात आला. समाजबांधवांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, रक्तगट तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिर तसेच दंतचिकित्सा व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिरांचा लाभ मोठ्या संख्येने समाजबांधव, माता-भगिनी व नागरिकांनी घेतला.
रॅली व शोभायात्रेनंतर मुख्य जयंती उत्सव व स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांवर आधारित समाजप्रबोधनपर मनोगत व्यक्त केले. संत तुकाराम महाराजांचे विचार आजच्या पिढीसाठी दिशादर्शक असून सामाजिक एकोपा, समता व मानवतेचा संदेश देणारे असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांच्यासह नगरपालिकेचे उपाध्यक्ष, सभापती, नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सन 2025 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याचप्रसंगी जगद्गगुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रतिष्ठापनेसाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
या संपूर्ण कार्यक्रमाला विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, समाजबांधव तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत, अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांना नगरपालिकेचे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन केले.
उत्सवाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला.








