
जमिनीत पुरलेला अनोळखी युवकाचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ!
कोरची तालुक्यातील कोटरा- बोगटोला मार्गावर घटना; मृतदेह कुजलेल्या अवस्थेत
गडचिरोली:कोरची तालुक्यातील कोटरा ते बोगटोला रस्त्यालगत असलेल्या एका गावाजवळ 25 ते 35 वयोगटातील अनोळखी युवकाचा मृतदेह जमिनीमध्ये पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोरची पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
कोरची पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी तलावालगत खड्डा करून मृतदेह पुरण्यात आला होता. मात्र मृतदेह पूर्णपणे जमिनीखाली झाकला न गेल्याने माती बाजूला सरकली आणि मृतदेहाचा काही भाग उघडा पडल्याचे निदर्शनास आले. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तो सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत युवकाच्या अंगात पॅन्ट व शर्ट असून, दोन्ही हातात कडे असल्याचे दिसून आले आहे. चेहरा पूर्णपणे काळा पडलेला असून, शरीरावर अळ्या लागलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मृत्यूबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याचा मृत्यू कसा आणि कोणत्या कारणामुळे झाला, तसेच हा संशयास्पद मृत्यू आहे की घातपात, याबाबत पोलिस विविध अंगाने तपास करीत आहेत. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून सखोल तपासाची मागणी केली जात आहे. कोरची पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, युवकाची ओळख पटविण्यासाठी आसपासच्या तालुक्यांमध्ये चौकशी करण्यात येत आहे.








