Home गडचिरोली आदिवासी शिक्षण व संस्कृती जतनासाठी पुढाकार; महाराष्ट्रातील पहिल्या गोंडी माध्यम शाळेला...

आदिवासी शिक्षण व संस्कृती जतनासाठी पुढाकार; महाराष्ट्रातील पहिल्या गोंडी माध्यम शाळेला श्री फाउंडेशनकडून शैक्षणिक पुस्तकांची भरीव मदत!

0
24

आदिवासी शिक्षण व संस्कृती जतनासाठी पुढाकार;

महाराष्ट्रातील पहिल्या गोंडी माध्यम शाळेला श्री फाउंडेशनकडून शैक्षणिक पुस्तकांची भरीव मदत!

 

गडचिरोली | दि. १ फेब्रुवारी :

महाराष्ट्रात गोंडी भाषेतून शिक्षण देणारी पहिली शाळा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मोहगाव येथील शाळेला शैक्षणिक पुस्तकांची आवश्यकता असल्याची माहिती मिळताच श्री फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ मदतीचा हात पुढे केला. फाउंडेशनच्या वतीने शाळेला आवश्यक शैक्षणिक पुस्तके व साहित्य प्रदान करण्यात आले.

 

या उपक्रमाअंतर्गत श्री फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सुपूर्द केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबाबत जाणून घेण्यात आले. गोंडी भाषेतील अध्यापन पद्धत, शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून फाउंडेशनचे सर्व सदस्य भारावून गेले.

 

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसोबत सामूहिक भोजनाचा आनंद घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक गोंडी नृत्याने उपस्थितांचे मन जिंकले. या सांस्कृतिक सादरीकरणामुळे आदिवासी परंपरा, संस्कृती आणि एकतेचा सुंदर अनुभव सर्वांना लाभला.

 

या कार्यक्रमास श्री फाउंडेशनचे अध्यक्ष इंजि. पायल श्रीकांत कोडापे, उपाध्यक्ष भाग्यश्री गडमावर यांच्यासह मंजू कोडापे, जिजाबाई कोडापे, सरिता चौधरी, प्रिया देशमुख, संध्या पवार, विद्या कांबळे, सोनाक्षी अवसरे, वैशालीताई मुंघाटे, प्रेमीला नवघरे, चेतन माशाखेत्री, प्रलय चहांदे, प्रकाश कोडापे आणि मामिता मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

गोंडीसारख्या आदिवासी भाषेतून शिक्षण देणाऱ्या या शाळेला मिळालेली मदत केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर आदिवासी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठीही अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

भविष्यातही आदिवासी व दुर्गम भागातील शिक्षणासाठी सातत्याने कार्य करत राहण्याचा निर्धार श्री फाउंडेशनच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!