Home गडचिरोली गडचिरोलीत खनिज वाहतुकीसाठी ८५.७६ किमी चारपदरी महामार्गास मंजुरी

गडचिरोलीत खनिज वाहतुकीसाठी ८५.७६ किमी चारपदरी महामार्गास मंजुरी

0
36
Oplus_131072

गडचिरोलीत खनिज वाहतुकीसाठी ८५.७६ किमी चारपदरी महामार्गास मंजुरी

 

पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा: मुख्यमंत्री

 

भंडारा–गडचिरोली समृद्धी महामार्ग विस्ताराला गती देण्याचे निर्देश

 

गडचिरोली, (जिमाका) दि. 27 :

मुंबई येथे आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळण व औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने व ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

समृद्धी महामार्गाच्या विस्ताराअंतर्गत नागपूर–गोंदिया मार्गासोबतच भंडारा–गडचिरोली महामार्गाच्या कामांना गती देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. या विस्तारामुळे गडचिरोली जिल्ह्याचा राज्यातील प्रमुख आर्थिक व औद्योगिक केंद्रांशी थेट आणि जलद संपर्क अधिक बळकट होणार आहे.

 

याच बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवेगाव-मोरे–कोनसरी–मूलचेरा–हेडरी–सुरजागड या महामार्गाच्या सुधारित ८५.७६ किलोमीटर लांबीच्या चारपदरी सिमेंट काँक्रिट रस्त्याला मान्यता देण्यात आली. हा महामार्ग खनिज वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून सुरक्षित, वेगवान व सुकर वाहतुकीस मोठी चालना मिळणार आहे.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणताही पायाभूत प्रकल्प रखडू नये, यासाठी काम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या व मंजुरी पूर्ण करूनच अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले. नियोजनबद्ध व कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

 

समृद्धी महामार्गाचा विस्तार तसेच सुरजागड मार्गाच्या चारपदरीकरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, खनिजाधारित उद्योग आणि एकूणच आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!