चंद्रपूर : घरी कुणीही नसल्याची संधी साधून दोन घरे फोडण्यात आली. यावेळी चोरट्यांनी रोख रकम, दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर रामनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना अटक केली आहे. चोरट्यांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. रजनीकांत केशव चानोरे (वय २२), जितेंद्र उर्फ जितु भाऊराव आगासे (वय ३७) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत.
शहरातील जगन्नाथबाबा नगरातील संदीप श्रीहरी गायकवाड (वय ४२) हे १७ ऑक्टेबरला घराला कुलूप लावून मित्रासोबत दांडिया बघण्यासाठी गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आलमारीचे लॉकर तोडून २ लाख ५३ हजार रुपये रोख लंपास केले. अशीच घटना जयराजनगर येथे घडली. २२ ऑक्टोबरला वैभव ब्रिजेश सिंग (वय ३६) हे देवदर्शनाला गेले होते. घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील ८ लाख ७४ हजार १६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. सिंग हे रात्री घरी आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली.
या दोन्ही घटनांच्या तक्रारी रामनगर पोलिस ठाण्यात करण्यात आल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रजनीकांत केशव चानोरे (रा. राजेंद्र वॉर्ड टाकळी भंडारा, ह. मु. सुमन अपार्टमेंट दिघोरी नागपूर) आणि जितेंद्र उर्फ जितु भाऊराव आगासे (रा. धरमनगर कन्हान जि. नागपूर) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत या चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी १ लाख ८८ हजार रुपये रोख, ८ लाख ७४ हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे ११ लाख ६२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकरी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगरचे पोलिस निरीक्षक राजेश मुळे, पोलिस निरीक्षक लता वाढिवे यांच्या नेतृत्त्वात गुन्हे शोध पथकातील अधिकारी, कर्मचारी व सायबर सेल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली
