
नॅशनल हायवेच्या अपूर्ण कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD अनिरुद्ध पालकर यांच्याकडून पाहणी
तक्रारींची दखल घेत प्रत्यक्ष कामाचा घेतला आढावा; जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाश गेडाम यांची उपस्थिती
मुदतीत काम पूर्ण न केल्यास कंत्राटदारावर कडक कारवाई; काळ्या यादीत टाकण्याचा इशारा
गडचिरोली : नॅशनल हायवेच्या सुरू असलेल्या बांधकामासह अपूर्ण कामांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) अनिरुद्ध पालकर यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाश गेडाम उपस्थित होते.
नॅशनल हायवेच्या बांधकामाची गती, अपूर्ण राहिलेली कामे तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने पालकर यांनी संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. कामामुळे नागरिक व वाहनधारकांना निर्माण होणाऱ्या अडचणींचीही त्यांनी माहिती घेतली.
यावेळी पालकर यांनी सांगितले की, मागील शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल हायवेच्या कामांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला नॅशनल हायवे विभागाचे अधीक्षक अभियंता, संबंधित अधिकारी तसेच काम करणारे कंत्राटदार उपस्थित होते. बैठकीत सुरू असलेल्या व अपूर्ण महामार्ग कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
“ज्या कंत्राटदाराला महामार्गाचे काम देण्यात आले आहे, त्याने निर्धारित कालावधीत आणि ठरवून दिलेल्या निकषांनुसार काम पूर्ण करणे आवश्यक आहे. मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाईही केली जाईल,” असे पालकर यांनी पाहणीदरम्यान स्पष्ट केल्याची माहिती आहे.
नॅशनल हायवेचे काम दीर्घकाळ अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रश्नाची दखल घेतल्याने कामाला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाश गेडाम यांनीही अपूर्ण कामांमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या पालकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. महामार्गाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणेने गांभीर्याने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.








