Home Breaking News गडचिरोली मतदारसंघातील आरोग्य सेवांचा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी घेतला आढावा

गडचिरोली मतदारसंघातील आरोग्य सेवांचा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी घेतला आढावा

0
12

गडचिरोली मतदारसंघातील आरोग्य सेवांचा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी घेतला आढावा

 

रुग्णालयांतील रिक्त पदे, मनुष्यबळाची कमतरता, रुग्णवाहिका व रुग्णांच्या अडचणींवर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची अनुपस्थिती, औषध खरेदी, MRI यंत्रणा, बांधकाम व विद्युत व्यवस्थेचे प्रश्न बैठकीत ऐरणीवर

 

रुग्णांना दर्जेदार व वेळेवर उपचार मिळालेच पाहिजेत; आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व उत्तरदायी करण्याच्या आमदार नरोटे यांच्या सूचना

 

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेत विविध समस्या आणि आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सुरपाम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे तसेच नियोजन अधिकारी गाडगे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य संस्था, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. विशेषतः रिक्त पदे, डॉक्टर व इतर आवश्यक मनुष्यबळाची कमतरता, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, आरोग्य सेवांमधील त्रुटी आणि प्रत्यक्षात रुग्णांना मिळणाऱ्या सेवांची स्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

 

रुग्णालयांमध्ये काही कर्मचारी व यंत्रणेकडून होणाऱ्या कथित निष्काळजीपणाबाबतही बैठकीत चर्चा झाली. रुग्णवाहिकांची संख्या, त्यांची सद्यस्थिती, देखभाल-दुरुस्ती आणि गरजेच्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास येणाऱ्या अडचणींचाही आढावा घेण्यात आला. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याबाबतही आमदार नरोटे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

 

“सर्वसामान्य नागरिक मोठ्या अपेक्षेने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतो. त्याला योग्य उपचार, आवश्यक औषधे आणि वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळणे ही आरोग्य यंत्रणेची जबाबदारी आहे. रुग्णांच्या उपचारात निष्काळजीपणा किंवा अनावश्यक विलंब होता कामा नये,” अशी भूमिका आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी बैठकीत मांडली.

 

गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध प्रश्नांकडेही बैठकीत विशेष लक्ष देण्यात आले. महाविद्यालयातील रिक्त पदे, प्राध्यापकांची अनुपस्थिती, आवश्यक मनुष्यबळ, औषधे व वैद्यकीय साहित्याची खरेदी, सुरू असलेली व प्रस्तावित बांधकामे, MRI यंत्रणेची उपलब्धता व तांत्रिक अडचणी तसेच विद्युत व्यवस्थेशी संबंधित समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्ह्यातील इतर शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक सुविधा सक्षम झाल्यास दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना उपचारासाठी अन्य जिल्ह्यांमध्ये जाण्याची वेळ कमी करता येईल. त्यामुळे उपलब्ध यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासोबत आवश्यक पदे व सुविधांबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

 

आरोग्य सेवा ही थेट नागरिकांच्या जीवनाशी निगडित बाब असल्याने रुग्णांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, आरोग्य सुविधांमधील त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, कार्यक्षम व उत्तरदायी पद्धतीने कार्यरत ठेवावी, अशा स्पष्ट सूचना आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

बैठकीत समोर आलेल्या समस्या आणि आवश्यक सुविधांबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करून नागरिकांना प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळेल याची दक्षता घ्यावी, असेही आमदार नरोटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!