Home Breaking News ‘फेक नॅरेटिव्हच्या जाळ्यात अडकू नका; सत्य पडताळूनच विश्वास ठेवा!’ – आमदार डॉ....

‘फेक नॅरेटिव्हच्या जाळ्यात अडकू नका; सत्य पडताळूनच विश्वास ठेवा!’ – आमदार डॉ. मिलिंद नरोटे

0
4

‘फेक नॅरेटिव्हच्या जाळ्यात अडकू नका; सत्य पडताळूनच विश्वास ठेवा!’ – आमदार डॉ. मिलिंद नरोटे

 डिजिटल युगात युवकांनी विवेकबुद्धीने विचार करावा; विकसित भारताच्या जडणघडणीत तरुणांची भूमिका निर्णायक!

गडचिरोली | प्रतिनिधी, दि. २२ नोव्हेंबर २०२६ : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा प्रचंड प्रसार होत असताना चुकीची माहिती, अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या ‘फेक नॅरेटिव्ह’पासून युवकांनी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही माहितीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता तिची सत्यता पडताळून पाहावी. युवकांनी विवेकबुद्धी, चिकित्सक दृष्टिकोन आणि सकारात्मक विचारांच्या बळावर देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले.

भारतीय जनता युवा मोर्चा, गडचिरोलीच्या वतीने सुमानंद सभागृह येथे आयोजित ‘युवा संवाद व विकसित भारत निबंध स्पर्धे’च्या उद्घाटनप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

यावेळी आमदार डॉ. नरोटे म्हणाले की, सोशल मीडिया हे माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीचे प्रभावी माध्यम असले तरी त्यावर प्रसारित होणारी प्रत्येक माहिती खरीच असेल असे नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे युवकांनी कोणत्याही फेक नॅरेटिव्हला बळी न पडता अभ्यासपूर्ण विचार करावा. योग्य-अयोग्य यातील फरक ओळखून सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची मानसिकता निर्माण करावी.

‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पपूर्तीत युवा पिढीच खरी परिवर्तनाची शक्ती ठरणार असल्याचे** सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. सन २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. भविष्यातील भारत कसा असावा, देशाच्या प्रगतीसाठी कोणत्या नव्या संकल्पना राबवाव्यात, याबाबत तरुणांचे विचार जाणून घेणे महत्त्वाचे आहे. युवकांच्या कल्पकतेतून, कर्तृत्वातून आणि सकारात्मक सहभागातूनच विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. अशोक नेते, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, भाजयुमो प्रदेश महामंत्री बादल राऊत, प्रदेश सचिव अमय विश्वरूप, माजी आमदार नामदेव उसेंडी, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, जिल्हा मंत्री प्रकाश गेडाम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, भाजयुमो शहराध्यक्ष साई सिलमवार व सतीश चिचघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच उपसभापती शिल्पा हेमके, नगरसेविका ज्ञानेश्वरी धंदरे, नगरसेविका अर्चना निंबोड, गायत्री सोमणकर, भारती खोब्रागडे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा संवाद आणि निबंध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विकसित भारताविषयी आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध झाली. युवकांमध्ये राष्ट्रनिर्मितीची जाणीव, चिकित्सक विचारसरणी आणि सामाजिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!