
मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात गडचिरोलीची आरोग्यसेवा अधिक सक्षम करणार
आरोग्य संस्थांनी समन्वयातून रुग्णांना दर्जेदार सेवा द्यावी — आमदार डॉ. मिलिंद नरोटे
गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा सातत्याने विस्तार करण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था अधिक व्यापक आणि सक्षम झाली आहे. आता या सर्व आरोग्य संस्थांनी परस्पर समन्वयातून नागरिकांना अधिक दर्जेदार, तत्पर आणि संवेदनशील आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिले.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.फैजल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर दुर्गम भागातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अहेरीसारख्या दुर्गम भागातही स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय मंजूर करून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावर गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयाची १०० खाटांची क्षमता आता दुप्पट करण्यात येत असून, नवीन विस्तारित इमारत काही दिवसांत कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर, अतिरिक्त मनुष्यबळ आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले, “मी स्वतः जवळपास १o वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात खासगी आरोग्य सुविधांची उपलब्धता तुलनेने मर्यादित असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा मुख्य आधार शासकीय आरोग्य यंत्रणाच आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला वेळेत, योग्य आणि दर्जेदार उपचार मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयाची अधिकृत क्षमता १०० खाटांची असली, तरी अनेकदा २०० ते ३०० रुग्णांना सेवा द्यावी लागते. त्यामुळे तेथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण होतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे उपलब्ध झालेले अतिरिक्त वैद्यकीय मनुष्यबळ आवश्यकतेनुसार वापरून महिला व बाल रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयावरील ताण कमी करावा, असे निर्देश देण्यात आले.
रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय यांच्यात स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे योग्य समुपदेशन करावे तसेच प्रशासकीय किंवा तांत्रिक बाबींमुळे रुग्णसेवा प्रभावित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही आमदार डॉ. नरोटे यांनी सांगितले.
बैठकीत पुढील महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले:
– सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज ॲडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट (ALS) रुग्णवाहिका खरेदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
– गंभीर रुग्णांच्या वाहतुकीसाठी लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध राहील, अशी व्यवस्था करावी.
– जिल्ह्यातील आवश्यक ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून काही रुग्णवाहिका आपत्कालीन सेवेसाठी राखीव ठेवाव्यात.
– महिला व बाल रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून तिचा काही भाग एका महिन्याच्या आत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करावा.
– विस्तारित महिला व बाल रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती व पदभरतीचा प्रस्ताव शासनस्तरावर तातडीने सादर करून त्याचा नियमित पाठपुरावा करावा.
– जिल्ह्यासाठी प्रस्तावित एमआरआय मशीनच्या खरेदीची प्रक्रिया गतिमान करावी.
– जिल्हा वार्षिक योजना आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून त्याचा नियोजनबद्ध विनियोग करावा.
– रुग्णालयांतील औषधे, उपकरणे, मनुष्यबळ आणि अन्य आवश्यक सुविधांचा नियमित आढावा घ्यावा.
– सर्व आरोग्य संस्थांनी परस्पर संवाद आणि समन्वयासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करावी.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगितले. जिल्हा वार्षिक योजना तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल; मात्र प्राप्त निधीचा योग्य, पारदर्शक आणि परिणामकारक विनियोग करून त्याचा थेट लाभ रुग्णांना मिळावा, असे निर्देश त्यांनी दिले.
मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या आधुनिक आरोग्य सुविधा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि वाढीव वैद्यकीय मनुष्यबळाचा प्रभावी वापर करून जिल्ह्याची आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यात येईल. प्रशासन, वैद्यकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून गडचिरोलीतील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी स्पष्ट केले.








