
वादळाच्या परिस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सकांची रात्री रुग्णालयात पाहणी
रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी डॉ. रवी गावंडे स्वतः वॉर्डात; बंद अवस्थेतील जनरेटर तातडीने सुरू करण्याचे निर्देश
गडचिरोली, दि. १८ सप्टेंबर २०२६ : जिल्ह्यात अचानक वादळी वाऱ्यासह प्रतिकूल हवामान निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवा सुरळीत राहावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी रात्री स्वतः रुग्णालयाची पाहणी करत विविध वॉर्डचा राऊंड घेतला.
रात्रीच्या वेळी रुग्णालयात पोहोचून डॉ. गावंडे यांनी विविध वॉर्डमधील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्यसेवा, आवश्यक सुविधा तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. प्रतिकूल हवामानामुळे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास रुग्णालयातील अत्यावश्यक आरोग्यसेवा प्रभावित होऊ नयेत, यासाठी पर्यायी वीजव्यवस्था सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पाहणीदरम्यान रुग्णालयातील जनरेटर बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते तातडीने सुरू करून कार्यान्वित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले. विशेषतः आपत्कालीन विभागासह अत्यावश्यक आरोग्यसेवांसाठी वीजपुरवठा अखंडित राहणे आवश्यक असल्याने कोणतीही हलगर्जी होऊ नये, याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले.
वादळी परिस्थितीत केवळ कार्यालयीन स्तरावर सूचना न देता जिल्हा शल्य चिकित्सकांनी रात्री स्वतः रुग्णालयात जाऊन व्यवस्थेची पाहणी केल्याने आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णालयाच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला.
रुग्णसेवा कोणत्याही परिस्थितीत विस्कळीत होऊ नये, आवश्यक यंत्रणा तत्पर आणि कार्यान्वित असावी तसेच रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश डॉ. रवी गावंडे यांनी यावेळी संबंधितांना दिले.








