Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांवर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांवर राज्यात मोफत उपचार

0
16

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांवर राज्यात मोफत उपचार

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, बजाज फायनान्स व स्माईल ट्रेन इंडिया यांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार; शस्त्रक्रियेसह प्रवास, निवास, औषधे आणि वाचा उपचारही पूर्णपणे मोफत

 

मुंबई | दुभंगलेले ओठ व टाळू (Cleft Lip and Palate) या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्यांना दर्जेदार उपचार सहज उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यात महत्त्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (महाराष्ट्र), बजाज फायनान्स आणि स्माईल ट्रेन इंडिया यांच्यात तीन वर्षांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, राज्यातील पात्र बालकांना आता संपूर्ण उपचार मोफत मिळणार आहेत.

 

या करारानुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत तपासणीत दुभंगलेले ओठ किंवा टाळू असलेली बालके आढळल्यास जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या संदर्भपत्राद्वारे त्यांना स्माईल ट्रेन इंडियाच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. संबंधित जिल्हे आणि भागीदार रुग्णालयांमध्ये समन्वय साधून उपचार प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या बालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुभंगलेले ओठ व टाळू यांच्या उपचारांबाबत अधिक माहितीसाठी १८०० १०३ ८३०१ या टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

बालकांना मिळणार या सर्व सुविधा मोफत

 

या उपक्रमांतर्गत बालकांना शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, आवश्यक औषधे, पोषणविषयक सेवा, दंतव्यंगोपचार, वाचा (स्पीच) उपचार तसेच गरजेनुसार प्रवासाची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. रुग्ण आणि पालकांच्या भोजन, निवास व प्रवासाचा खर्चही स्माईल ट्रेन इंडिया उचलणार असून, शस्त्रक्रियापूर्व तपासण्या आणि शस्त्रक्रियेनंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतीवरील उपचारांची जबाबदारीही संस्थेकडे राहणार आहे.

 

जिल्हानिहाय तपासणी शिबिरे आणि प्रशिक्षण

 

बालकांची वेळेत ओळख पटावी यासाठी स्माईल ट्रेनची भागीदार रुग्णालये, आरबीएसके पथके आणि जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्र (DEIC) यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांची ओळख, संदर्भ प्रक्रिया आणि उपचाराबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

राज्यातील या १५ रुग्णालयांमध्ये होणार मोफत उपचार

 

या सामंजस्य करारांतर्गत महाराष्ट्रातील १५ मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांवर उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये पुढील रुग्णालयांचा समावेश आहे :

 

१. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, वर्धा

२. आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, अहिल्यानगर

३. आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, जळगाव

४. बेंबडे हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर

५. एलिट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर

६. लहाने हॉस्पिटल, लातूर

७. मीरा एनएक्स हॉस्पिटल, मुंबई

८. एमआरआर चिल्ड्रन्स हॉस्पिटल, ठाणे

९. पूना हॉस्पिटल, पुणे

१०. सहयोग हॉस्पिटल, गोंदिया

११. श्रीराम हॉस्पिटल, अकोला

१२. शुश्रूषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल, मुंबई

१३. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, नागपूर

१४. वेदांत हॉस्पिटल प्रा. लि., नाशिक

१५. वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस (विन्स), कोल्हापूर

 

या उपक्रमामुळे राज्यातील दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांना वेळेत, दर्जेदार आणि सर्वसमावेशक उपचार उपलब्ध होणार आहेत. विशेषतः उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरणार असून, बालकांना निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्याची नवी संधी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!