
गडचिरोली भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न; ‘सेवा संकल्प अभियान’ बूथ स्तरापर्यंत यशस्वी करा – जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार अभियानाचे नियोजन; १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान जिल्हाभर विविध सेवा उपक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे येथील प्रदेश बैठकीतील भाषणाचे वाचन; अभिनंदन व राजकीय प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीची बैठक तथा ‘सेवा संकल्प अभियान’ कार्यशाळा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या ‘कर्तव्य कक्ष’ कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या कार्यशाळेत सविस्तर नियोजन करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘सेवा संकल्प अभियान’ केवळ जिल्हा किंवा मंडल स्तरापुरते मर्यादित न ठेवता बूथ स्तरापर्यंत प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. अभियानाच्या कालावधीत पक्षाने निश्चित केलेले विविध सेवा उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबवून अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून, मंडल आणि बूथ स्तरापर्यंत संघटनात्मक समन्वय साधून अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यावर कार्यशाळेत भर देण्यात आला.
कार्यशाळेच्या मंचावर आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपा जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबाळकर, राज्य परिषद सदस्य डॉ. चंदा कोडवते, रेखा डोळस, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील भांडेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधु भांडेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑगस्ट रोजी पुणे येथे झालेल्या भाजपा प्रदेश बैठकीत केलेल्या भाषणाचे वाचन करण्यात आले. यासोबतच अभिनंदन प्रस्ताव आणि राजकीय प्रस्ताव मांडण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आवाजी मतदानाने या प्रस्तावांना मंजुरी दिली.
कार्यशाळेची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने करण्यात आली, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. माजी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत वाघरे यांनी कार्यशाळेचा समारोप केला.
या जिल्हा बैठकीला आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, विविध मोर्चांचे जिल्हा व मंडल पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








