
संजय गांधी निराधार योजना तालुका समितीच्या बैठकीत 39 प्रकरणांना मंजुरी; सदस्य आकाश सातपुते यांच्या पुढाकाराने ३१७ दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी
संजय गांधी निराधार योजना तालुका समितीच्या बैठकीत सातपुते यांनी मांडला दिव्यांगांच्या बंद मानधनाचा प्रश्न
पात्र UDID कार्डधारक ३१७ लाभार्थ्यांची यादी अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे; मानधन पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा
तहसीलदार सागर कांबळे यांची माहिती; निराधार व गरजू लाभार्थ्यांच्या ३९ प्रकरणांना सर्वानुमते मंजुरी
दि. 31/08/2026
गडचिरोली : संजय गांधी निराधार योजना तालुका समितीच्या बैठकीत तालुक्यातील निराधार व गरजू लाभार्थ्यांच्या एकूण ३९ प्रकरणांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. याच बैठकीत समिती सदस्य आकाश सातपुते यांनी दिव्यांग लाभार्थ्यांच्या बंद झालेल्या मानधनाचा प्रश्न ठळकपणे उपस्थित केल्यानंतर प्रशासनाकडून कार्यवाहीची माहिती देण्यात आली. गडचिरोली तालुक्यातील ३१७ दिव्यांग लाभार्थ्यांची यादी अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली असून, मंजुरीनंतर त्यांचे रखडलेले मानधन पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात संजय गांधी निराधार योजना तालुका समितीची आढावा व मंजुरी बैठक पार पडली. बैठकीत समितीसमोर आलेल्या विविध प्रकरणांची छाननी आणि चर्चा करण्यात आली. त्यानंतर पात्र ठरलेल्या निराधार व गरजू लाभार्थ्यांच्या ३९ प्रकरणांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, बैठकीत दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रलंबित मानधनाचा मुद्दा विशेष चर्चेचा विषय ठरला. समिती सदस्य आकाश सातपुते यांनी हा प्रश्न उपस्थित करताना २७ मार्चच्या शासन निर्णयानुसार तात्पुरते वैध (Temporary Valid) UDID कार्ड असलेल्या काही दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन बंद झाल्याचा मुद्दा मांडला. संबंधित लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
याबाबत माहिती देताना तहसीलदार सागर कांबळे यांनी शासनाने संबंधित नियमात सुधारणा केल्याचे सांगितले. आता वैध UDID (Valid UDID) कार्डधारक पात्र लाभार्थ्यांना योजनेचा नियमित लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यानुसार गडचिरोली तालुक्यातील अशा ३१७ दिव्यांग लाभार्थ्यांची यादी तयार करून अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. जिल्हास्तरावरून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांचे बंद झालेले मानधन पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या बैठकीला तहसीलदार सागर कांबळे, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर ठाकरे, समिती अध्यक्ष यश कोंडावार यांच्यासह समिती सदस्य आकाश सातपुते, शंकर नैताम, दत्तू माकोडे, वसंत गावतुरे, उषा बनसोड, शीतल बनसोड, संदीप शिंगाडे आणि प्रमोद उमरगुंडावार उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजनेतील पात्र गरजू, निराधार तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे मानधन आणि योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.








