
भाजपा महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाच्या कार्यकारिणी सदस्यपदी हेमंत बोरकुटे यांची नियुक्ती
कृषी बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे यांच्यावर पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी
गडचिरोली, दि. १९ : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाच्या कार्यकारिणी सदस्यपदी कृषी बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी, कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांना राज्यस्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
किसान मोर्चाचे प्रदेश प्रभारी व भाजपा प्रदेश महामंत्री आ. संजय कुटे तसेच महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.
हेमंत बोरकुटे हे कृषी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी व कृषी क्षेत्राशी सातत्याने जोडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी, कृषी मालाला योग्य बाजारपेठ, उत्पादनाला मिळणारा भाव तसेच ग्रामीण भागातील विविध प्रश्नांची त्यांना जवळून जाण आहे. त्यांच्या कार्याचा अनुभव आणि शेतकरी वर्गाशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क लक्षात घेऊन पक्षाने त्यांची महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाच्या कार्यकारिणीवर नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांना राज्यस्तरावर प्रभावी व्यासपीठ मिळण्यास मदत होणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध शेतकरी कल्याणकारी योजना, कृषी क्षेत्रातील उपक्रम तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या संघटनात्मक पातळीवर मांडून त्यासाठी पाठपुरावा करण्याची महत्त्वाची जबाबदारी बोरकुटे यांच्यावर राहणार आहे.
नियुक्तीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव
हेमंत बोरकुटे यांच्या नियुक्तीबद्दल भाजपा पदाधिकारी, किसान मोर्चाचे कार्यकर्ते, कृषी बाजार समितीतील सहकारी तसेच शेतकरी बांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पक्षाने सोपविलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत शेतकरी हितासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार हेमंत बोरकुटे यांनी व्यक्त केला.








