
गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गा 353 C व 130 D वरील निकृष्ट व रखडलेल्या कामांवर संताप; दोषी कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३(C) व १३०(D) अंतर्गत सुरू असलेल्या विविध रस्ते बांधकामांमध्ये होत असलेल्या प्रचंड विलंब, निकृष्ट दर्जाचे काम आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त होत भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सविस्तर निवेदन सादर करून संबंधित कंत्राटदारांचे टेंडर तात्काळ रद्द करून त्यांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३(C) अंतर्गत आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील १६ कि.मी., १९ कि.मी. व ५९ कि.मी., आलापल्ली–आष्टी–लगाम मार्गावरील ४५ कि.मी., तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. १३०(D) अंतर्गत आलापल्ली–भामरागड मार्गावरील ११२ कि.मी. रस्ते बांधकामाची कामे मागील तीन ते चार वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण काम रखडले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या महामार्गांवरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतकरी, व्यापारी आणि मालवाहतूक वाहने प्रवास करतात. मात्र अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे वारंवार अपघात होत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
या कामांबाबत नागरिकांनी अनेकदा आंदोलने, मोर्चे आणि निवेदने देऊनही संबंधित कंत्राटदारांविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी असून शासनाच्या विकासकामांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे डॉ. होळी यांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व कामांची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे टेंडर तात्काळ रद्द करावे, संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत (Blacklist) टाकावे, दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी तसेच नव्याने पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवून दर्जेदार काम करणाऱ्या कंत्राटदारामार्फत ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे.








