Home गडचिरोली सहकार क्षेत्रात गडचिरोलीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! ‘आदिवासी बांबू प्रक्रिया संस्था’ला मुख्यमंत्री देवेंद्र...

सहकार क्षेत्रात गडचिरोलीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! ‘आदिवासी बांबू प्रक्रिया संस्था’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सहकारी ग्रामविकास गौरव पुरस्कार

0
7
Oplus_131072

सहकार क्षेत्रात गडचिरोलीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! ‘आदिवासी बांबू प्रक्रिया संस्था’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सहकारी ग्रामविकास गौरव पुरस्कार’

 

गडचिरोली | प्रतिनिधी | ४ जुलै २०२६

 

गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी करत ‘आदिवासी बांबू प्रक्रिया संस्था, गडचिरोली’ या आदिवासी सहकारी संस्थेला सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत ‘सहकारी ग्रामविकास गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला.

 

संस्थेच्या वतीने अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ग्रामीण आणि आदिवासी भागातील बांबू आधारित उद्योगांना चालना देणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सक्षमीकरण तसेच सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेत हा सन्मान संस्थेला बहाल करण्यात आला.

 

या पुरस्कारामुळे केवळ संस्थेचाच नव्हे, तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा गौरव झाला असून, आदिवासी भागातील सहकार चळवळीला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत, राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर, मंञी मंगलप्रभात लोढा,आमदार प्रसाद लाड,आमदार चिञा वाघ,आमदार संजय भेंडे,आमदार डॉ.राहूल आवाडे,आमदार डॉ.विनय कोरे यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला राज्यभरातील सहकारी संस्था, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

‘आदिवासी बांबू प्रक्रिया संस्था’ गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीतील आदिवासी बांधवांना बांबू प्रक्रियेद्वारे स्वावलंबी बनविण्याचे कार्य करत आहे. बांबूला मूल्यवर्धन करून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि सहकाराच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा आदर्श उभा करण्याचे काम संस्थेने सातत्याने केले आहे. याच उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाने दखल घेत हा प्रतिष्ठेचा ‘सहकारी ग्रामविकास गौरव पुरस्कार’ संस्थेला बहाल केला.

 

या यशाबद्दल गडचिरोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून विविध सामाजिक, राजकीय व सहकारी क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी व सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार भविष्यात आदिवासी भागातील सहकार चळवळीला अधिक बळ देणारा आणि ग्रामीण विकासासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!