
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या सूचनेनुसार मूलचेरा तालुक्याची संघटन बैठक संपन्न
बैठकीत SIR अभियान, बूथ बळकटीकरण व वृक्षलागवडीवर भर
गडचिरोली:भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या सूचनेनुसार मुलचेरा तालुक्याची संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. आगामी संघटनात्मक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर SIR अभियान, बूथ बळकटीकरण, पदवीधर मतदार नोंदणी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून पदाधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत SIR अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक बूथवरील BLO-2 यांनी संबंधित शासकीय BLO यांच्या समन्वयाने मतदार नोंदणीसाठी आवश्यक फॉर्म भरण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच प्रत्येक बूथवर नियोजनबद्ध पद्धतीने अभियान राबवून कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी ‘एक बूथ – किमान २५ वृक्ष’ या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक बूथवर किमान २५ वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी हा उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करण्याचे आवाहनही करण्यात आले.
तसेच ज्या कार्यकर्त्यांची अथवा पात्र नागरिकांची पदवीधर मतदार नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करून अधिकाधिक पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
बैठकीला भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा मुलचेरा तालुका प्रभारी सुरेश शहा, तालुका अध्यक्ष संजीव सरकार, जिल्हा सचिव बादल शहा, तालुका सचिव निखिल हलदार, मंठु सरदार तसेच तालुक्यातील विविध आघाड्या, मोर्चे आणि बूथस्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. आगामी काळात बूथ बळकटीकरण, सदस्य संपर्क, मतदार नोंदणी आणि विविध जनहिताच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








